मराठी

फडणवीसांनी घालविली नैतिकता

एकनाथ खडसे यांनी डागली तोफ

जळगाव/दि.५ –  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खडसे यांनी तोफ डागली आहे. फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करू शकत नाही. कारण मुहुर्त साधत लग्न करून शपथ घेत तीन चार दिवस संसार करत ते मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री झाले होते. तीन-चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहिल्यावर पतिव्रता आहोत, असे आम्ही म्हणू शकत नाही. कारण आता नैतिकता घालवली गेली आहे, अशा परखड शब्दांत खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
खडसे यांनी सांगितले, की फडणवीस एकटेच लढत असून महाराष्ट्रभर फिरत आहे. पूर्वी आमचे टीम वर्क होते. त्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी यांच्या तोफा चालायच्या. माझ्यासह पंकजा मुंडे, गिरीश बापट, विनोद तावडे, हरिभाऊ बागडे असा आमचा एकत्र ताफा होता. त्यामुळे सरकार घाबरून, गांगरून जायचे; मात्र आता महाराष्ट्रातील सर्व नेते शांत आहेत. जनतेने निवडून दिलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेते अधूनमधून बोलतात; मात्र जी आक्रमक भाषा पाहिजे, ती त्यांच्यात कुठेच दिसत नाही. आम्ही कमी पडत आहोत.
राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना १२३ भाजप आमदार निवडून आणले; मात्र युती झाल्यावर १०७ कसे झाले, असा सवाल या वेळी खडसे यांनी उपस्थित केला. पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईल… हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळे असताना पराभव झालाच कसा, असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट खडसे यांनी केला; मात्र आपण भाजप सोडणार नाही. कारण पक्ष आम्ही उभा केला, असे देखील खडसे यांनी सांगितले.
खडसे म्हणाले, “मी गेली४० वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे; मात्र पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा कधी स्फोट होईल, हे मी सांगू शकत नाही, भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारा कार्यकर्ता आहे. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे.”

Related Articles

Back to top button