मराठी

सदोष अहवाल असूनही अँटिजेन चाचण्या अधिक

डाॅ. गंगाखेडकर यांचे निरीक्षण; आरटीपीसीआर चाचण्या करण्याचा सल्ला

पुणे दि २७ – देशामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा वेगाने वाढतो आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या  बैठकीत अँटिजन चाचण्यांऐवजी जास्तीत जास्त आरटी-पीसीआर चाचण्या करण्याचा सल्ला दिला; परंतु तसे घडताना दिसत नाही. बिहार-तेलंगणासारखी राज्ये ८० टक्क्यांहून जास्त अँटिजन चाचण्या करीत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडूसारख्या राज्यांत रुग्ण वाढतच आहेत. अँटिजन चाचण्यांचे अहवाल हाच सर्वांत मोठा धोका आहे, असा इशारा आयसीएमआर चे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिला.
आयसीएमआरने कोरोना चाचण्यांचा घालून दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन होत असल्याचे निदर्शनास आणून ते म्हणाले, की सर्व राज्ये अँटिजन चाचण्या वाढवत आहेत; मात्र अँटिजन चाचण्यांत कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो, तेव्हा तत्काळ त्याची आरटी-पीसीआरही करण्याचे निर्देश आहेत; मात्र त्याचे कठोरपणे पालन होत नाही. हे समाजासाठी बरे नाही. संसर्ग असूनही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यास त्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होत राहील. हे अत्यंत धोकादायक आहे.
आरटी-पीसीआर आणि अँटिजन या दोन्ही प्रकारच्या चाचण्या व्हायला हव्यात. दोन्हींची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. लक्षण दिसल्यास तत्काळ टेस्ट करायची असेल तर अँटिजन केली जावी. कारण, आरटी-पीसीआरचा रिपोर्ट येण्यास २४ तास लागतात. तथापि, शक्यतो आरटी-पीसीआरच करावी, असे आयसीएमआरने स्पष्ट केलेले आहे, असे सांगून डाॅ. गंगाखेडकर म्हणाले, की जर एखाद्या राज्यात पुरेशा संख्येत तपासणी होत असेल आणि तेथील रुग्णालयांत खाटा रिकाम्या असतील, तर त्याचा अर्थ सरकार जे सांगते ते खरे आहे. नोंदीत रुग्ण कमी आहेत; मात्र बेड्स रिकामे नसल्यास त्याचा अर्थ तेथे चाचण्या कमी घेतल्या जात आहेत.
काही ठिकाणी जास्त रुग्ण तर काही ठिकाणी कमी का, या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, की  आपला देश विशाल आहे. येथे सर्वत्र सारखी स्थिती असू शकत नाही. त्यामुळे ‘पीक’ कुठे आधी येईल, तर कुठे नंतर. सध्या जेथे रुग्ण कमी आहेत, तेथे आगामी काळात ते वाढतील. मग ते बिहार असो, की उत्तर प्रदेश. लसीच्या सुरक्षिततेबाबत डाॅ. गंगाखेडकर म्हणाले, की  लस किती काळ सुरक्षा देईल, हे आधीच सांगणे कठीण आहे. हा आजार १० महिनेच जुना आहे. लसीचा प्रभाव समजण्यासाठी २-३ वर्षांचा काळ जावा लागतो. त्यामुळे लस किती काळ प्रभावी असेल, याचा दावा कोणत्याही कंपनीला करता येणार नाही. तसा दावा केला जात असेल, तर तो चुकीचा आहे.

  • आजार समजून घेतल्याने मृत्यूचे प्रमाण कमी

सुरुवातीस आजार व त्यावरील उपचारांबाबत स्पष्टता नव्हती. पीपीई किट्स नव्हते, पुरेशा संख्येने एन-९५ मास्क नव्हते. कोणते उपचार करायचे, हेही माहीत नव्हते. रुग्ण भरती होताच थेट व्हेंटिलेटर लावले जायचे. हेही मृत्यूमागील एक कारण होते. अनुभवातून उमगले की ऑक्सिजन सपोर्ट आणि रुग्णाला पोटावर झोपवल्यानेच चांगल्या पद्धतीने उपचार करता येतात. जगभरात आजवर जेवढे आजार आले, त्यापैकी कोरोनालाच सर्वांत कमी वेळेत समजून घेता आले. त्याचे कारण अवघ्या जगभरातील वैज्ञानिक फक्त याच एका कामात झटत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button