नवी दिल्ली दि . ८ – मार्केट कॅप अर्थात बाजार भांडवलच्या अर्थाने देशातील सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्यासाठी गेल्या काही महिन्यापासून केवळ आनंदवार्ताच येत आहेत. काही दिवसांपूर्वी रिलायन्स जगातील दुसरा मोठा ब्रॅन्ड झाला. कोरोना काळात जिओमुळे अंबानी यांनी कंपनीला कर्ज मुक्त केले. जगातील श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी आता चौथ्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या रियल टाइम नेटवर्थनुसार अंबानी यांची संपत्ती ८०.६ अब्ज डॉलर म्हणजे जवळपास ६.०३ लाख कोटी इतकी आहे. श्रीमंतांच्या यातीत अंबानी आता फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या जवळ आले आहेत. झुकरबर्ग यांची संपत्ती १०२ अब्ज डॉलर इतकी आहे. सध्या या दोघांच्या संपत्तीत बरेच अंतर असले, तरी अंबानी यांनी गेल्या काही आठवड्यात वेगाने झेप घेतली आहे. ताज्या क्रमवारीनुसार अंबानींच्या पुढे झुकरबर्ग तिसर्या क्रमांकावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेटस् दुसर्या स्थानावर आणि पहिल्या स्थानावर अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस हे आहेत. अंबानी यांनी एलव्हीएमएचचे बर्नार्ड अर्नोल्ट आणि कुटुंबीयांना मागे टाकले. बर्नार्ड अर्नोल्ट सध्या पाचव्या क्रमांकावर आहेत, तर वॉरेन बफे सहाव्या स्थानावर आहेत.
ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्स हे श्रीमंतांच्या रियल टाइम संपत्तीचे अपडेट देत असते. हे आकडे स्थिर नसतात. जगभरातील शेअर मार्केटनुसार त्यात चढ-उतार होत असतात. विशेष म्हणजे याआधी जुलैच्या दुसर्या आठवड्यात (१४ जुलै) मुकेश अंबानी जगातील सहाव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती झाले होते. तेव्हा त्यांची संपत्ती ७२.४ अब्ज डॉलर इतकी होती. त्यानंतर २२ जुलै रोजी ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फक्त आठ दिवसांत त्यांची संपत्ती २.६ अब्ज डॉलरने वाढली. एका अहवालानुसार मुकेश अंबानी २०३३ साली ट्रिलेनिअर होतील. ते जगातील पाचवे ट्रिलेनिअर असतील. अंबानी जेव्हा ट्रिलेनिअर होतील, तेव्हा त्यांचे वय ७५ असेल, तर अॅमेझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेजोस पुढील सहा वर्षात म्हणजे २०२६ साली जगातील पहिले ट्रिलेनिअर होतील. वयाच्या ६२व्या वर्षी बेजोस ट्रिलेनिअर असतील.