मुंबई महापालिका देशात सर्वांत भ्रष्ट
आ. राधाकृष्ण विखे यांचा आरोप; गाळात गुंतलेले हात शोधण्याची गरज
नगरः देशात सर्वांत भ्रष्ट महापालिका म्हणून मुंबई महापालिकेचा उल्लेख होतो. विरोधी पक्षनेता असतानाही मी हा आरोप केला आहे. ही महापालिका म्हणजे प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था आहे, असा आरोप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. ‘मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतले आहेत, याचाही शोध घेण्याची गरज आहे,‘ असे ते म्हणाले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने विळदघाट येथे सिंधुताई विखे पाटील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. विखे पाटील, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते या सेंटरचे लोकार्पण झाले. या वेळी खासदार डॉ. सुजय विखे, महापौर बाबासाहेब वाकळे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, ‘आयएमए‘चे अध्यक्ष अनिल आठरे, डॉ. अभिजीत दिवटे आदी उपस्थित होते. या वेळी राधाकृष्ण विखे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबईसह येथील उपनगरांची जी बिकट अवस्था झाली आहे, याबाबत भाष्य करताना त्यांनी मुंबई महापालिका प्रशासनासह शिवसेनेवर सडकून टीका केली. त्याच नाल्यातील गाळ काढायचा, त्याची बिले करायची व पुन्हा त्याच नाल्यात तो गाळ जातो, अशी परिस्थिती आहे. मुंबईच्या गाळामध्ये किती लोकांचे हात गुंतलेले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. त्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली, तर राजकारण सुरू केले जाईल,‘ असा टोला त्यांनी लगावला. विखे म्हणाले, की आज मुंबईची दुर्दशा झाली आहे, पाणी जाण्यास जागा नाही, पाणी साचले आहे. मोठ्या प्रमाणात सामान्य जनतेचे हाल होतात. याला संपूर्णतः मुंबई महापालिका व ज्यांच्या अधिपत्याखाली गेली २५ वर्षे ही महापालिका कार्यरत आहे, ती शिवसेना जबाबदार आहे.