दंगलीच्या वेळी मुस्लिमांनी केले हनुमान मंदिराचे रक्षण!
आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला
बंगळूर/दि. १२ – बंगळूरतील आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. तसेच अनेक वाहने जाळण्यात आली. या आमदाराच्या घरासमोरच हनुमान मंदिर आहे. या मंदिराला कोणताही धोका निर्माण होऊ नये, म्हणून स्थानिक मुस्लिम युवकांनी मानवी साखळी तयार करून या मंदिराचे रक्षण केले. त्यांच्या या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांची सर्व स्तरातून प्रशंसा होऊ लागली. एकमेकांचा हात पकडून आणि साखळी निर्माण करून हे मुस्लिम युवक मंदिराचे संरक्षण करत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
पुलाकेशी नगरात मंगळवारी रात्री जमावाने पोलिस ठाणे आणि काँग्रेस आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावर हल्ला केला. या आमदाराच्या कथित निकटवर्तीयाने एका समाजाबाबत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केल्यानंतर ही घटना घडली. या फेसबुक पोस्टनंतर हिंसा मोठ्या प्रमाणावर भडकली. हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या. तरीही हिंसक जमाव नियंत्रणात न आल्याने अखेर पोलिसांनी गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला. या बाबत पोलिसदलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आमदाराच्या एका नातेवाइकाने कथित स्वरुपात एक पोस्ट ‘सोशल मीडिया‘वर शेअर केली. या पोस्टमुळे एका विशिष्ट समुदारायाचे लोक भडकले. हे पाहता हनुमानाचे मंदिर वाचवण्यासाठी मुस्लिम तरुणांनी केलेला प्रयत्न अतिशय प्रशंसनीय असाच आहे. भारताची खरी ओळख ही विविधतेत एकता अशी आहे आणि ही ओळख जपण्याचे काम या मुस्लिम तरुणांनी केले आहे.