-
मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे
अमरावती, दि. 18 : मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, हातांची नियमित स्वच्छता आदी दक्षता नियमांचे पालन करणे हेच कोरोनापासून मुक्ती मिळविण्यासाठी शस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षतेचे पालन करून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
ग्रामीण भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन कोविड रुग्णांचा शोध घेणे, त्यांना तातडीने उपचार उपलब्ध करुन देऊन मृत्यूदर कमी करणे यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, प्रबोधन हाच परिणामकारक उपाय आहे व याव्दारेच आपण ग्रामीण भागातील जनतेला सुरक्षित ठेवू शकतो. यामध्ये लोकसहभाग आवश्यक आहे. या अनुषंगाने मोहिम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी अचूक माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. येडगे यांनी केले आहे.
: जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दक्षता त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने आवश्यक तपासणी व जनजागृतीसाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. आरोग्य पथकाव्दारे ग्रामिण भागातील प्रत्येक गाव/पाडे-वस्त्या/तांडे यातील प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी, कोमॉर्बीड आजार असल्यास उपचार आणि प्रत्येक नागरिकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण, जनजागृती व प्रबोधन करण्यात येत आहे. नागरिकांनी या मोहिमेत परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी केले आहे.
दरम्यान, मोहिमेत लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पदाधिकारी, अधिकारी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती आदी सन्माननीय लोकप्रतिनिधींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक जिल्हा परिषदेकडून घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. येडगे यांनी मोहिमेचे उद्दिष्ट, स्वरुप, नियोजन आदींबाबत माहिती बैठकीत दिली.
मोहिम कालावधीत आरोग्यपथकाव्दारे प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती, जोखीम गटातील नागरिकांची माहिती, शरीराचे तापमान तपासणी, रुग्ण आढळून आल्यास जवळच्या ताप उपचार केंद्रामध्ये संदर्भित करणे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, सतत हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे इत्यादी बाबतची जनजागृती आणि प्रबोधन करण्यात येत आहे. या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने तपासणी करुन घेणे, आजाराची माहीती आरोग्य पथकाला सांगणे, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व पटवून देणे आदींसाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. या मोहिमेचे महत्व पटवून दिल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यास निश्चितच मदत होऊ शकेल, असे आवाहन श्री. येडगे यांनी यावेळी केले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. विठ्लराव चव्हाण, सभापती आरोग्य समिती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात व साथरोग अधिकारी डॉ. च-हाटे आदी सभागृहात उपस्थित होते.