मराठी

कोरोना नियंत्रण व आरोग्य शिक्षणासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम

 प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे - पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 6 : – कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच गावोगाव प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राज्य शासनाकडून राबविण्यात येणार आहे. त्यानुसार या मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात परिपूर्ण नियोजन करावे व समन्वयाने अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर (State Minister for Women and Child Development and Guardian Minister Ed. Yashomati Thakur) यांनी दिले आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्यात ‘चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ ही मोहिम सातत्याने राबविण्यात येत आहे. मोहिमेद्वारे विविध टप्प्यांत 20 लक्षांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आला आहे. लक्षणे आढळलेल्या नागरिकांना उपचारासाठी दाखल करून घेणे, संशयितांचा शोध आदींसह जनजागृतीचेही या मोहिमेतून करण्यात आले. लक्षणे आढळलेल्या नागरिकांच्या नियमित संपर्कासाठी यंत्रणाही उभारण्यात आली. त्याचप्रमाणे, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम सर्वदूर यशस्वीपणे राबविण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे व संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने मोहिम राबवावी, असे निर्देश पालकमंत्री एड. ठाकूर यांनी दिले आहेत.

मोहिमेअंतर्गत राज्यातील 2 कोटी 25 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे. जिल्ह्यातही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य, महसूल, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विविध विभाग, संस्थांनी समन्वय व नियोजन करावे. मोहिमेत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक कुटुंबांपर्यंत घरोघरी जाऊन लोकांची ताप आणि ऑक्सिजन लेव्हल तपासणी, लोकांना आरोग्य शिक्षण आणि महत्वाचे आरोग्य संदेश देणे, तसेच संशयित कोरोना रुग्ण शोधणे आदी बाबी पार पाडणार आहेत. त्याचप्रमाणे, उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, किडनी विकार, लठ्ठपणा यासारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधून काढणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचाही त्यात समावेश आहे.

ही मोहीम पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान, तर दुसऱ्या टप्प्यात 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत दोनवेळा हे स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबाला भेटणार आहेत.ग्रामपंचायतीपासून तर महानगरपालिकेपर्यंत लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा  सहभाग मिळवावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

नागरिकांमध्ये, तसेच विद्यार्थी, तरूणांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी, पालक,  नागरिक अशा विविध गटांसाठी निबंध स्पर्धा, संदेश स्पर्धा, चित्रकला स्पर्धा इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे. स्वयंसेवी संस्थांसह विविध क्षेत्रातील संस्थांचा सहभागही मोहिमेत मिळवावा. विविध माध्यमांतून मोहिमेबाबत प्रभावी प्रसार करावा व जनजागृती कार्यक्रमात सातत्य ठेवावे, असेही निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

Related Articles

Back to top button