नारायणमूर्तींची जावई महाराणीपेक्षा श्रीमंत

मुंबई २९ : भारतातील सर्वांत मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक इंग्लंडचे अर्थमंत्री आहेत. आपली मालमत्ता सांगताना पारदर्शकता न ठेवल्याने ते रडारवर आले आहेत. मूर्ती यांची मुलगी अक्षताचे इन्फोसिसमध्ये ०.९१ टक्के भागभांडवल आहे. त्याचे मूल्य ४३०० कोटी रुपये (४३० मिलियन पौंड) आहे. कौटुंबिक कंपन्यांमधील भागभांडवलामुळे अक्षता इंग्लंडच्या श्रीमंत महिलांपैकी एक आहेत. त्या इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथपेक्षाही श्रीमंत आहेत. महाराणीकडे ३५०० कोटी रुपयांची (३५० मिलियन पौंड) मालमत्ता आहे.
अक्षता इतर अनेक कंपन्यांमध्येही संचालक आहेत; मात्र ऋषी यांनी सरकारी रजिस्टरमध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही. ऋषी सुनक यांच्याकडे दोन हजार कोटी रुपयांची (२०० मिलियन पौंड) मालमत्ता असल्याचे बोलले जाते. ते इंग्लंडमधील सर्वात श्रीमंत खासदारही आहेत. कर्तव्य पार पाडताना हिताला बाधा आणणाऱ्या सर्व आर्थिक बाबी जाहीर करणे इंग्लंडमध्ये प्रत्येक मंत्र्याला आवश्यक आहे. सुनक यांनी गेल्या महिन्यात रजिस्टरला दिलेल्या माहितीत अक्षता वगळता कोणताच उल्लेख केला नाही. अक्षता लहान कंपनी कॅटामारान व्हेंचर्सची मालक असल्याचेच फक्त त्यांनी सांगितले; मात्र ताज्या वृत्तात खुलासा झाला की, अक्षता व त्यांच्या कुटुंबाचे अनेक आर्थिक हित इंग्लंडमध्ये गुंतले आहेत. अक्षता मूर्तींची मालमत्ता अब्ज-खर्व रुपयात आहे. अक्षता व ऋषी यांची भेट स्टॅनफोर्ड विद्यापीठात झाली होती. दोघांनी २००९मध्ये लग्न केले. कोरोनाकाळात इंग्लंडमध्ये पॅकेज दिल्याने ऋषी चर्चेत आले होते.