मराठी

तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजेच राष्ट्रनिर्माण

राष्ट्रपती कोविंदचे प्रतिपादन

पुणे/दि.२९– देशात क्रीडा संस्कृती विकसित करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. मला आनंद आहे की अलिकडच्या काळात कॉपोर्रेट, शैक्षणिक आणि स्वयंसेवी संस्था क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करु लागल्या आहेत. खेळांमधून चारित्र्यवान पिढी निर्माण होते. तरुणाईला खेळांशी जोडणे म्हणजेच राष्ट्रनिर्माण होय. याच पद्धतीने क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन व्यापक झाल्यास 2028 मध्ये ऑलिम्पिक पदक विजेत्या पहिल्या दहा देशांमध्ये येण्याचे देशाचे लक्ष्य गाठता येईल, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (दि. 29) केले.
आंतरराष्ट्रीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त घोषित करण्यात आलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनी दरवर्षी राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, द्रोणाचार्य अणि तेनसिंग नोर्गे हे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन 2020 चे हा सोहळा ऑनलाईन घेण्यात आला. यावेळी राष्ट्रपती बोलत होते. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यावेळी उपस्थित होते. देशभरातील पुरस्कार विजेत्यांनी आपापल्या राज्यात स्थानिक क्रीडा अधिकाख्रयांकडून पुरस्कार स्विकारले. महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई येथे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी पुरस्कार स्विकारले.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, कोविडमुळे यंदा ऑलम्पिंक स्पर्धा रद्द झाल्याचा परीणाम खेळाडूंच्या मनोबलावर होण्याची शक्यता आहे. मात्र या स्थितीतही खेळाडूंना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जात आहे. आजचा पुरस्कार सोहळा ऑनलाईन घेण्यामागेही खेळाडूंचा उत्साह कायम ठेवण्याची भूमिका आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये कब्बडी, मल्लखांब यासारख्या देशी खेळांपासून बास्केटबॉल, रोईंगपर्यंतच्या वीसपेक्षा क्रीडा प्रकारातले खेळाडू आहेत. यावरुन देशात सर्व प्रकारच्या खेळांना उत्तेजन मिळत असल्याचे दिसत आहे. खेळांमधून देशवासियांच्या भावना उल्हासित होतात. देशाला जोडण्याचे, एकसंध राखण्याचे काम खेळातून साधले जाते. तत्पुर्वी राहुल आवारे, दत्तू भोकनळ, सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. मनिका बात्रा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक नंदन बाळ यांना ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हे सर्वजण पुण्यातून पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button