मराठी

राष्ट्रीय हरित लवादाचा फटाकेबंदीचा आदेश

नवी दिल्ली/दि.९  – देशभरातील वायू प्रदूषणामुळे ढासळणारी हवेची गुणवत्ता लक्षात घेऊन नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (राष्ट्री हरित लवादा) ने (NGT) एक मोठा निर्णय घेतला आहे. एनजीटीने आज रात्री ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीच्या वापरावर बंदी घातली असून देशातील इतर राज्यांनाही आदेश दिला आहे.
एनजीटीने आपल्या आदेशात म्हटले आहे, की ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता योग्य आहे अशा शहरात फक्त प्रदूषण न करणारे हरित फटाके विकण्यास आणि फोडण्यास परवानगी आहे. दिवसातून दोनच तास फटाके फोडता येतील. दिवाळी, छठ पूजा, ख्रिसमस आणि नवीन वर्षांसाठी ही सवलत देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी दिल्ली सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आधीच बंदी घातली आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही देशाची राजधानी दिल्ली व त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये फटाके विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर इतर राज्यांकडून अशा मागण्या उद्भवू लागताच एनजीटीने या प्रकरणाची व्याप्ती वाढविली.
यापूर्वी एनजीटीने एका याचिकेवर सुनावणी करताना चार राज्ये आणि पर्यावरण मंत्रालयाला नोटीस पाठविली होती. फटाक्यांवर बंदी घालण्याच्या याचिकेवर या नोटिसाद्वारे राज्यांकडून उत्तर मागितले होते. माध्यमांच्या अहवालानुसार या संदर्भात राज्यांनी एनजीटीला आपले उत्तर पाठवले होते, त्यानंतर एनजीटीने आज या महत्त्वाच्या विषयावर आदेश काढले. एनजीटीच्या आदेशापूर्वी देशातील अनेक राज्यांनी फटाके फोडण्यास बंदी घातली होती. यात हरयाणा आणि कर्नाटकचा समावेश आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने फटाके वाजविण्यास बंदी घातली आहे. लोकांनी फटाके वाजविण्याचे टाळावे असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आपल्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घातली आहे. दिवाळीच्या रात्री आठ ते रात्री दहाच्या दरम्यान ’फुलझाडी’, ’डाळिंब’ यासारख्या फटाक्यांचा वापर करता येईल, असे पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button