मुंबईः राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा रंगली आहे; पण राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी या वृत्ताचे खंडन केले. उलट, भाजपतच गेलेले आमदार आणि ज्येष्ठ नेते पुन्हा राष्ट्रवादीत येणार असून पक्षफोडणे म्हणजे काय असते, हे भाजपला दाखवून देऊ, असे प्रतिआव्हान मलिक यांनी दिले आहे. मलिक यांनी ट्वीट करून या प्रकारावर खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अश्या बातम्या पेरल्या गेल्या आहेत; पण ही निव्वळ अफवा आहे. राष्ट्रवादीचे कोणतेही आमदार भाजपच्या गळाला लागलेले नाही, अशी माहिती मलिक यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीतून अनेक नेते हे भाजपमध्ये दाखल झाले होते. आता हेच नेते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. या नेत्यांना परत पक्षात घ्यायचे, की नाही याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबद्दल निर्णय घेऊन घोषणा केली जाईल, असेही मलिक यांनी सांगितले. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीचे दिवाळीनंतर दिवाळे काढण्याचा आराखडा भारतीय जनता पक्षाने आखला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात दिवाळी आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तापालट करण्याकरिता भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीनिशी तयारी करत आहे, अशी माहिती पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने दिली होती. सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तापलट करण्यात रस नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. कर्नाटक त्यानंतर मध्य प्रदेश आणि आता राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तापालट करण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र राजस्थानमध्ये भाजपचा डाव फसला. महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचे दिल्ली दरबारी नियोजन सुरू झाले आहे. जुलै महिन्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत जवळपास पन्नास मिनिटे चर्चा केली. त्यानंतर शाह यांनी फडणवीस यांना जेवणासाठी आमंत्रण दिले. शाह यांच्या ‘डिनर डिप्लोमसी‘ मागे राज्यातील महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याची नियोजन तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परतु इच्छिणा-यांना पक्षात प्रवेश द्यायचा, की नाही, यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल. काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील, त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.
कामासाठी भेट म्हणजे पक्षप्रवेश नव्हे! मलिक यांच्या दाव्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. मतदारसंघातील कामांसाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांची भेट घेणे म्हणजे पक्षात प्रवेश करणे नव्हे, असे पाटील यांनी म्हटले आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. भाजपचे काही आमदार आपापल्या मतदारसंघातील कामांच्या निमित्ताने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले होते; मात्र त्याचा अर्थ ते भाजपमध्ये प्रवेश करणार असा होता. अनेकांचे जुने संबंध कायम आहेत. त्यातून अशा भेटीगाठी होत असतात, असे पाटील म्हणाले.