मराठी

‘फेसबुक‘वर लवकरच सुरू करणार न्यूज सर्विस

‘फेसबुक न्यूज‘ केवळ अमेरिकेत लाँच करण्यात आली होती

मुंबई/ दि. २६ – ‘फेसबुक‘ने लवकरच ‘फेसबुक न्यूज‘(Facebook News) ही वृत्तसेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारताव्यतिरिक्त ही सेवा फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन आणि ब्राझीलमध्येही सुरू केली जाईल. ‘फेसबुक न्यूज‘ केवळ मागील वर्षी अमेरिकेत लाँच करण्यात आली होती. अलीकडेच फेसबुकवर असे आरोप झाले होते, की कंपनी त्याच्या व्यासपीठावर भाजपची बाजू घेत आहे. यानंतर कंपनीने आपली भूमिका मांडली आणि स्पष्ट केले, की फेसबुक कोणाचीही बाजू घेत नाही. भारतात फेसबुकचे सुमारे तीस कोटी वापरकर्ते आहेत.
माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीने ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म‘(Social Media Platform)च्या कथित गैरवापराबाबत चर्चा करण्यासाठी फेसबुकला २ सप्टेंबरला बोलावले आहे. १ सप्टेंबरच्या बैठकीसाठी दळणवळण व गृहमंत्रालयांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालय, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रसार भारती यांच्या प्रतिनिधींना ‘मीडिया मानकांमधील नैतिक मानक‘ यावर चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे.

Back to top button