मराठी
३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी, दिवसा जमावबंदी
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला/दि.५ (जिमाका) -कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, शासनाने संपूर्ण राज्यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शुक्रवार दि.३० एप्रिल २०२१ पर्यंत निर्गमित केलेल्या आदेशान्वये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवार दि.३० एप्रिल पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार दि.३० एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जारी करण्यात आली असून दि.३० पावेतो शुक्रवारी रात्री आठ ते सोमवार सकाळी सात वाजेपर्यंत मुक्त संचारास मनाई असेल. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत हे निर्बंध लागू केले आहेत.
जारी केलेल्या आदेशानुसार, संपूर्ण अकोला जिल्ह्याकरीता दि.५ रोजी रात्री आठ वाजेपासून ते दि.३० रोजी रात्री ११ वा. ५९ मि. वाजे पावेतो खालील प्रमाणे सुधारीत आदेश पारीत करण्यात आले आहेत.
-
संचारबंदी व Night Curfew
संपूर्ण अकोला जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपावेतो संपूर्ण अकोला जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन गर्दी करण्यास मनाई राहील.
शुक्रवार रात्री आठ वाजेपासून ते सोमवार सकाळी सात वाजेपावेतो अत्यावश्यक कारणाव्यतिरीक्त नागरिकांना मुक्तपणे संचार करण्यास मनाई असेल.
या निर्बंधातून मेडीकल व इतर अनुषंगिक अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, कंपनीत जाणारे व येणारे कामगार यांना सुट राहील. तथापि संबंधितांनी ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहील.
वरील प्रमाणे निर्बंधातून-हॉस्पिटल, रोगनिदान सेंटर्स, क्लिनीक्स, मेडीकल इन्श्युरन्स कार्यालये, औषध विक्रेते व कंपन्या, इतर वैद्यकीय आरोग्य सेवेशी संबंधित घटक व पशुवैद्यकिय सेवा. किराणा दुकाने, भाज्यांचे दुकाने, डेअरी, बेकरी, मिठाई दुकाने, फळ दुकाने.रेल्वे, टॅक्सी, ऑटो व सार्वजनिक बस सेवा.मान्सून पूर्व कामे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था. माल वाहतूक. कृषी संबंधित सेवा. ई कॉमर्स.मान्यताप्राप्त मिडीया,सर्व पेट्रोल पंप , गॅस वितरण प्रणाली, वाहनांसाठी वापरण्यात येणा-या गॅस वितरण सुविधा. शिवभोजन, स्वस्त धान्य दुकान व त्याबाबतची वाहतुक. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घोषित करण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवा यांना सुट राहील.