मुंबई/दि.१५ – सेवा क्षेत्र सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी स्थिर झाले आहे; मात्र नव्या व्यवसायातील कमतरतेमुळे उत्पादकता अद्यापही आक्रसलेली आहे. एवढेच नव्हे तर, नोकऱ्यांच्या बाबतीत आताही चांगली बातमी येत नाही. सप्टेंबरमध्ये सलग सातव्या महिन्यात नोकऱ्यांत घट नोंदली गेली. आयएचएस मार्केटने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आली.
भारताचा सर्व्हिस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) सप्टेंबरमध्ये ४९.८ अंकावर पोहोचला. ऑगस्टमध्ये ४१.८ वर होता. सेवा क्षेत्रातील घसरणीचा हा सलग सातवा महिना आहे. सलग दहा महिन्यांपर्यंत क्षेत्रातील उत्पादनात घसरण आली होती. पीएमआय ५० वर असल्यास क्षेत्रातील हालचाली वाढल्याचे सूचक समजले जाते. आयएचएस मार्केटच्या असोसिएट डायरेक्टर(Economics) पॉलियाना डी लिमा म्हणाल्या, की सेवा क्षेत्र सुधारणेच्या दिशेने जात आहे. नव्या ऑर्डरमध्येही सुधारणा आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची हिस्सेदारी ५५ टक्के आहे.
एक ऑक्टोबरला जारी झालेल्या आकड्यांनुसार, सप्टेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय सुमारे साडेआठ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५६.८ नोंदला होता. हा जानेवारी २०१२ नंतरचा सर्वात उच्च स्तर आहे. ऑगस्टमध्ये हा ५२ वर होता. सेवा, मॅन्युफॅक्चरिंगचा कंपोझिट पीएमआय आऊटपूट इंडेक्स सप्टेंबरमध्ये ५४.६ वर पोहोचला. ऑगस्टमध्ये हा ४६ होता. लिमा यांनी सांगितले, की मॅन्युफॅक्चरिंगच्या कामगिरीचा समावेश केल्यास चांगले चित्र समोर येते. सहा महिन्यांत प्रथमच खासगी क्षेत्राचे उत्पादन वाढले आहे. फेब्रुवारीनंतर प्रथम विक्रीत वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये कंपन्यांचा गुंतवणूक खर्च वाढला. कच्च्या मालाचा महागाई दर फेब्रुवारीनंतर सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला; मात्र सेवा क्षेत्राच्या कंपन्या आर्थिक तेजीबाबत आश्वस्त आहेत. एप्रिलनंतर सप्टेंबर पहिला महिना आहे, ज्यात कंपन्या पुढील एक वर्षांत वृद्धीच्या शक्यतांबाबत आश्वस्त दिसतात.
नजीकच्या काळात नोकर भरती
सर्वेक्षणानुसार, मजुरांच्या तुटवड्यामुळे लोकांना नोकरीवर ठेवण्याच्या कंपन्यांच्या योजनांवर परिणाम झाला आहे; मात्र प्रलंबित ऑर्डर्स पाहिल्यास कंपन्या नजीकच्या काळात भरती सुरू ठेवतील. अशा स्थितीत आगामी महिन्यांत नोकऱ्यांची चांगली स्थिती पाहायला मिळू शकते.