मराठी
महाराष्ट्र शिक्षक आघाडी तर्फे प्राचार्य गावंडे यांचा नामांकन अर्ज दाखल
शिक्षक विरूध्द शिक्षक नसलेले उमेदवार सामना रंगणार
अमरावती दि १२- अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे अधिकृत उमेदवार प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी आपला निवडणूक नामांकन अर्ज दाखल केला.
प्राचार्य डॉ निलेश गावंडे हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, प्राचार्य फोरमचे सचिव, तसेच महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष असून या पदावर कार्य करतांना शिक्षकांसाठी केलेल्या कार्याच्या बळावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांनी शिक्षक नसलेल्या उमेदवारांच्या भाऊगर्दीत एक शिक्षक म्हणून शिक्षकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत बुलडाणा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा.नरेंद्र खेडेकर, प्राचार्य फोरमचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सिकची , प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे , मुख्याध्यापक विठ्ठलराव कुलट, प्राचार्य डॉ. विवेक गुल्हाने , प्रा.सुभाष शेळके, प्रा. अनंत काकडे तसेच महाराष्ट्र शिक्षक आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
कुशल संघटक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा दांडगा अनुभव, व्यापक जनसंपर्क शिस्तबध्द प्रचार यंत्रणा तसेच गेल्या पंचवीस वर्षात शिक्षकांसाठी केलेल्या कार्याच्या बळावर ते यंदा बाजी मारतील अशी शक्यता शैक्षणिक वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.