मराठी

घाईगडबडीत कोणत्याही गोष्टी सध्या उघडता येणे शक्य नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

ठाणे/दि.२४– जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरु झाले आहे. त्यानूसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणो शक्य नाही, किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोर्पयत त्या सुरु केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thakaray) यांनी सांगितले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोनाबाबत (Corona) केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदींसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
गणपती उत्सव सुरु झाला आहे, दिड दिवसांच्या गणपतीचे विसजर्न झाले. परंतु आधी एक प्रश्न नेहमी विचारला जायचा, उत्सव कसा होणार, विसजर्न कसे होणार, पंरतु सर्वधर्मीयांनी सामाजिक जाणीवेतून उत्सव साजरे केले. त्यासाठी सर्वाना धन्यवाद देतो असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई आणि मुंबईला जोडून एमएमआरडी क्षेत्रत मागील काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसत होती. परंतु मागील महिनाभरात सर्वानी अंत्यत खंबीरपणाने या साथीचा मुकाबला करायला सुरवात केली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या ही कमी झालेली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इतर राज्यात किंवा जगभरात लॉकडाऊन ओपन करण्याची घाईगडबड केली आहे. परंतु तशी घाई महाराष्ट्र अजिबात करणार नसल्याचेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
एखादी गोष्ट सुरु करायची असेल तर त्याची पूर्ण खातरजमा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी ठाणे, कल्याण, नवीमुंबई येथील महापालिकांना महत्वाच्या सुचना दिल्या असल्याचेही सांगितले. त्यानुसार कोरोना रोखण्यात जरी कौतुकाची थाप मिळत असेल तरी गाफील न राहता आपल्याला हा आकडा शुन्यपर्यत आणायचा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण डोंबिवलीत जरी कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी आता ती रोखण्यासाठी काही महत्वाच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यानुसार पुढील 20 ते 25 दिवसात यात नक्कीच बदल दिसून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर खाजगी रुग्णालयात आजही जर लुट होत असेल तर तक्रार करा, त्या तक्रारीची नक्कीच दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related Articles

Back to top button