चंदीगड/दि. १२ – राजस्थानमधील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर ३२ दिवसांनी पडदा पडला असताना आता पंजाबमधील लाथाळी उघड झाली आहे. पंजाब काँग्रेसमध्ये मतभेद शिगेला पोहोचले आहेत. राज्यसभेचे सदस्य प्रतापसिंह बाजवा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग व प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. यापूर्वी नवज्योत सिद्धू यांनी कागाळ्या केल्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात आले होते. आता बाजवा यांच्याबाबत काँग्रेस काय भूमिका घेते, हे पाहायचे. राज्यातील काँग्रेसचे ९० टक्के आमदार मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि जाखड यांच्याविरोधात असल्याचा दावा बाजवा यांनी केला आहे. अशा परिस्थितीत पक्षश्रेष्ठींनी त्यांना काढून टाकावे. अन्यथा, पंजाबमधील काँग्रेसचा खेळ संपेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. बाजवा म्हणाले, की हे आमदार सरकारच्या बाजूने पत्र देत असले, तरी सत्य हे आहे की हे आमदार सरकार व संघटनेवर रागावले आहेत. सिंग व जाखड यांचे पंजाबमध्ये नेतृत्व पुढे चालू ठेवावे, अशी आमदारांची इच्छा नाही. पक्षश्रेष्ठींना याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल. सोनिया गांधी qकवा राहुल गांधी यांनी गटाऐवजी सर्व आमदारांना दिल्ली येथे बोलावून त्यांच्या व्यथा ऐकल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
दिल्लीला आमदारांना बोलवून त्यांचे म्हणणे ऐकण्याच्या वेळी मुख्यमंत्री कॅ. सिंग व जाखड यांना तेथे बोलवून उपयोग नाही. आमदारांच्या संतप्त भावना ते ऐकू शकणार नाहीत. मी पुढची निवडणूक कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात लढणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षश्रेष्ठींनी सर्वांची बाजू ऐकून घेतली पाहिजे. कॅ. सिंग यांची बाजू पक्षश्रेष्ठी घेणार असतील, तर २०२२ मध्ये पंजाबमधील काँग्रेसचा खेळ संपलेला असेल, असा इशारा बावजा यांनी दिला. विशेष म्हणजे विषारी दारूच्या प्रकरणात बाजवा आणि राज्यसभेचे सदस्य शमशेरसिंग दुलो यांनी सीबीआय चौकशीसाठी राज्यपालांना निवेदन दिले. त्यानंतर पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत लढाई चव्हाट्यावर आली. गेल्या ४० वर्षांपासून आपल्याला देशद्रोही आणि मूलतत्त्ववाद्यांपासून धोका आहे. अशा परिस्थितीत माझे संरक्षण काढून घेतले जात असेल, आणि त्यामुळे मला काही झाले, तर त्याला मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिला. मला मिळालेल्या केंद्रीय सुरक्षेमुळे जर राज्याची सुरक्षा काढून टाकण्यात आली असेल तर सुखबीर बादल आणि बिक्रमसिंह मजीठिया यांच्यासह माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना राज्य सुरक्षा का पुरवत आहे, असा सवाल बाजवा यांनी केला. या तिघांनाही केंद्राची सुरक्षा आहे.
संरक्षण काढल्याचे मुख्यमंत्र्यांकडून समर्थन
सुरक्षेच्या मुद्यावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर qसग म्हणतात, की मी बाजवाची सुरक्षा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिस महासंचालकांवर बाजवांचा शाब्दिक हल्ला हा काँग्रेसच्या तत्त्वांविरूद्ध आहे. बाजवांची काही तक्रार असेल तर माझ्याकडे qकवा पक्षश्रेष्ठींकडे करायची. त्यांचा पक्षश्रेष्ठींवर विश्वास नाही का, असा सवाल त्यांनी केला.