ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत !: नाना पटोले
ओबीसी आरक्षणासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटणार
आरक्षणासंदर्भातील आरएससची भूमिका भाजपाने आधी स्पष्ट करावी.
मुंबई, दि. ७ डिसेंबर-ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी सर्वपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीतच आरक्षण टिकावे यावर चर्चा होऊन ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण ठेऊन निवडणुका घ्याव्यात व त्याबाबतचा अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला. या अध्यादेशाला आगामी अधिवेशनात कायद्याचे स्वरुप द्यावे असा निर्णय झाला. सुप्रीम कोर्टाने अध्यादेशाला स्थगिती दिली आहे, यावरील पुढील सुनावणी १३ तारखेला होत असून त्यावेळी राज्य सरकार आपली भूमिका मांडेल आणि त्यातून निश्चित मार्ग निघेल असे आम्हाला वाटते.ओबीसींच्या आरक्षणाचा गुंता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळेच वाढला आहे. भाजपाची याबद्दलची दुट्टपी भूमिका आहे. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समान नागरी कायद्यासाठी आग्रही आहे तर दुसरीकडे भाजपा ओबीसींच्या आरक्षणासाठी लढत आहे असे दाखवून लोकांची दिशाभूल करत आहे. भाजपा व आरएसएस यांचा अजेंडाच मुळात आरक्षण संपवण्याचा आहे. आरएसएसची आरक्षणाबद्दलची भूमिका आधी भाजपाने स्पष्ट करावी व मग आंदोलनाबदद्ल त्यांनी बोलावे. त्यांचा छुपा अजेंडा सर्वांना माहित आहे, त्यांचा खरा चेहरा समोर आला पाहिजे. भाजपा बहुजनांची दिशाभूल करत आहे. काँग्रेस सुरुवातीपासूनच आरक्षणाच्या बाजूने आहे आणि ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेसची भुमिका आहे, असे प्रदेशाध्यक्ष म्हणाले.