मराठी

गव्हाणकुंड येथील बेपत्ता साहेबराव परतेती यांची

जंगलात आढळली कवटी आणि हातापायांची हाडे

वरुड/दि . ४  – येथून जवळच असलेल्या शेकदरी शिवारातील जंगलामध्ये एका इसमाची कवटी आणि हातापायाचे हाडे सापडल्याने खळबळ माजली आहे. पोळा सणापासुन गव्हाणकुंड येथील साहेबराव परतेती नामक इसम बेपत्ता होता, घटनास्थळावर सापडलेले कपडे आणि चाबीवरुन ती कवटी आणि इतर साहित्य साहेबराव याचेच असल्याचे नातेवाईकांनी सांगितल्यानंतर अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
प्राप्त माहीतीनुसार, शेकदरी शेतशिवारातील दाते यांचे शेतामध्ये साहेबराव चैतराम परतेती (६०) हा इसम गेल्या अनेक वर्षांपासुन सोकारीचे काम करीत होता. जंगलालगत असलेल्या शेतामध्ये मुक्कामी राहून तो सोकारीचे काम करीत होता. गेल्या पोळयापासुन साहेबराव अचानक बेपत्ता झाला होता. त्याची पत्नी गेल्या काही वर्षांपासुन त्याचेपासुन वेगळी राहात होती त्यामुळे त्याचेसंदर्भात कोणीही त्याचा शोध घेतला नाही. अखेर काल गव्हाणकुंड लगतच्या शेकदरी शेतशिवारामध्ये एक कवटी आणि हातापायाची हाडे आढळून आल्याची माहीती वरुड पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक संभे, मनोज कळसकर, प्रशांत पोकळे यांचेसह वनविभागाच्या अधिका:यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. घटनास्थळावर कवटी, हातापायाच्या हाडांसह एक चाबी आणि अंगावरील कपडे आढळून आले, त्यावरुन नातेवाईकांनी तो मृतदेह साहेबराव परतेती यांचाच असल्याची ओळख संागितली.
साहेबराव परतेती यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप माहीती मिळु शकली नाही परंतु जंगली जनावरांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. याप्रकरणी वरुड पोलिसांनी रुपराव चैतराम परतेती यांच्या फिर्यादीवरुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक संभे, मनोज कळसकर, प्रशांत पोकळे  करीत आहेत.

Related Articles

Back to top button