मराठी

दिवाळी बाजारात येतील दीड लाख कोटी रुपये

मुंबई/दि.३१  – केंद्र सरकारच्या कर्मचा-याना दिवाळीपूर्वी प्रवास भत्ता व बोनस मिळाला आहे. अनेक राज्य सरकारे व रेल्वेनेही बोनसची घोषणा केली आहे. अनलॉकपासून उद्योगांतील भरभराटीमुळे बाजारपेठेला चालना मिळू शकते. त्यामुळे बाजारात दीड लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.
रिलायन्स, मारुती, विप्रो, इन्फोसिससह अनेक कंपन्यांनीही पूर्ण पगारासह बोनस, प्रमोशन आणि पगारवाढ दिली आहे. एम.के. ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसनुसार, प्रवास भत्ता, बोनसमुळे बाजारात चैतन्य पसरले आहे. केंद्र सरकारप्रमाणे खासगी कंपन्यांनीही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठेत एक ते दीड लाख कोटी रुपये येऊ शकतात. रिटेलर्स असोसिएशनचे सीईओ कुमार राजागोपालन सांगतात, की दिवाळीपासून लग्नसराईही सुरू होत आहे. त्यामुळे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये बाजारपेठेत दोन लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज आहे.
केंद्र सरकारच्या ४७ लाख कर्मचा-यासाठी विविध योजनांद्वारे ३६ हजार कोटी रुपये बाजारपेठेत येतील. रेल्वे ७८ दिवसांचा बोनस देणार आहे.  मारुती-सुझुकीने ‌वार्षिक व्हेरिएबल परफॉर्मन्स रिवॉर्डनंतर ऑक्टोबरमध्ये पगारवाढ दिली. रिलायन्सने पगार कपात बंद केली आहे. बोनसही देण्यात येणार आहे.  आयसीआयसीआय बँकेने कर्मचाऱ्यांच्या पगारात आठ टक्के वाढ आणि बोनसही दिला. टाटा मोटर्स स्पेशल बोनस व प्रॉडक्शन लिंक पेमेंट देणार आहे.  एअरटेलने ८० टक्के कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून पगारवाढ दिली.  जिंदल स्टील व पॉवरने पूर्ण वेतन लागू केले आहे. एशियन पेंटने बेसिक पगाराच्या बरोबरीने बोनस व पगारवाढ दिली.  महिंद्रा ने जुलै-ऑगस्टमध्ये बोनस व पगारवाढ दिली.

Back to top button