नवीदिल्ली/दि.१० – राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA ) देशातील एक मोठा राजकीय गट मानला जातो; मात्र दोन दिवसांपूर्वी केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर व मागील महिन्यात पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडल्यानंतर आता केंद्रीय कॅबिनेटमधील जवळपास सर्वच जागी भाजपचे मंत्री आहेत. आता केंद्रीय मंत्रिमंडळात केवळ एकच गैरभाजप मंत्री उरले आहेत, ते म्हणजे भारतीय रिपब्लीकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले. अर्थात तेही राज्यमंत्री आहेत. शिवाय ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर निवडून गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मंत्रिमंडळ आता शतप्रतिशत भाजप असे झाले आहे. १९७७ पासून हे पहिल्यांदाच घडले आहे, की आघाडी सरकारमधील सर्व कॅबिनेट मंत्री हे एकाच पक्षाचे आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अनेक राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने कॅबिनेटमध्ये सहकारी पक्षांना तीन स्लॉट दिले होते. सुरुवातीपासूनच आपल्या १५ सदस्यांसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी झालेल्या संयुक्त जनता दलाने मंत्रिमंडळाच्या बाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेचे अरविंद सावंत हे अवजड उद्योगमंत्री बनले, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांच्याकडे अन्न प्रकिया उद्योगमंत्री म्हणून जबाबदारी होती. लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व वितरण मंत्री बनवण्यात आले. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षातील राजकीय नाट्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अरqवद सावंत यांनी मागील वर्षी राजीनामा दिला. त्यानंतर मागील महिन्यात कृषी विधेयकास विरोध करत हरसिमरत कौर बादल यांनीदेखील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. शिवाय, त्यांचा पक्ष अकाली दलानेदेखील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली. आता प्रदीर्घ आजारानंतर लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांचा मृत्यू झाल्याने भाजपचा आणखी एक सहकारी पक्ष केंद्रीय मंत्रिमंडळातून कमी झाला. त्यामुळे आता केवळ भारतीय रिपब्लीकन पक्षाचे रामदास आठवले हे एकमेव गैरभाजप मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळात उरले आहेत.
बिहार निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार
गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बातम्यादेखील समोर येत आहेत; मात्र त्याबद्दल सध्यातरी कुठलीही घोषणा झालेली नाही. नवरात्रोत्सव काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात होती; मात्र बिहार विधानसभा निवडणुकीमुळे हे लांबणीवर पडल्याचे दिसते आहे. आता बिहार निवडणुकीनंतरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारास मुहूर्त लागण्याची शक्यता दिसत आहे.