हाथरस प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन
लखनऊ/दि.२० – उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान, सीबीआय तपासात एक नवीन बाब उघडकीस आली असून त्यातील एक आरोपी लवकुश हा अल्पवयीन आहे. त्याला इतर आरोपींसोबत थेट कारागृहात पाठविल्याने आता पोलिस गोत्यात आले आहेत.
अलिगड कारागृहातील चार आरोपींपैकी लवकुश हा अल्पवयीन आहे. त्याच्या घरातून मिळालेल्या दहावीच्या गुणपत्रिकेवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. गुणपत्रक बाहेर आल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची चौकशी सीबीआयने केली. आरोपी लवकुश 2018 मध्ये जेएस इंटर कॉलेजमधून हायस्कूलची परीक्षा पास झाला. त्याची जन्म तारीख दोन डिसेंबर 2002 आहे. अशा परिस्थितीत त्याचे वय 17 वर्षे 10 महिने आहे. 14 सप्टेंबर रोजी ही घटना घडली, तेव्हा तो 17 वर्षे 9 महिने 12 दिवसांचा होता. असे असूनही, त्याला इतर आरोपींप्रमाणे तुरूंगात पाठविण्यात आले. त्याला तुरूंगात पाठवण्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो.
सोमवारी सीबीआयने अलिगड कारागृहात संदीप, रामू, रवी आणि लवकुश या चार आरोपींची सुमारे साडेसात तास स्वतंत्रपणे चौकशी केली. यापूर्वी सीबीआयने न्यायालयाची परवानगी घेतली. सीबीआयची टीम सकाळी ११..45 वाजता कारागृहात आली आणि सायंकाळी साडेसात वाजता बाहेर पडली.