मराठी
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना खुले पत्र
अमरावती/दि.२४ – मागील सहा महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना संक्रमणाचे थैमान पसरले आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या जवळपास १२ हजार झाली असून जवळपास २५३ लोकांचा मृत्यू झालेला आहे. अमरावती जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये कोणतेही मोठे उद्योग नसल्यामुळे लाखोच्या घरात बेरोजगारी आहे. तसेच मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन असल्यामुळे शेतकरी, मजूर व मध्यमवर्गीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेली आहे. अनेक परिवाराच्या सदस्यांनी कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्याही केली आहे. अशा स्थितीत कोरोना संक्रमण जिल्ह्यात वाढत आहे. परंतु मागील सात महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटना व राज्य सरकारने वारंवार सूचना व या जीवघेण्या आजाराबाबतच्या सर्व सूचना दिल्या होत्या. परंतु जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये ३०० खाटांचे सुपर स्पेशालिटी कोविड रूग्णालयाच्या पलिकडे एकही शासकीय कोविड रूग्णालय उघडण्याबाबतचे धाडस केले नाही. मात्र दुसरीकडे कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जिल्हा प्रशासनाने १० ते १२ खासगी कोविड रूग्णालयांना परवानगी दिलेली आहे. यापैकी अध्र्यापैकी जास्त खासगी कोविड रूग्णालय दाट वस्तीच्या ठिकाणी हॉटेल व मंगल कार्यालयांमध्ये थाटण्यात आलेले आहे. त्याठिकाणी पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसून त्या खासगी रूग्णालयात कार्यरत असलेले कर्मचारी बिनधास्तपणे वस्तीमध्ये व मार्केटमध्ये वावरत असतात. त्यामुळे खासगी रूग्णालयामध्ये बरे होणा:यांच्या संख्येपेक्षा त्या भागामध्ये जास्त संख्येने कोरोना संक्रमण पसरले आहे. एकीकडे जीव घेणारा हा आजार व दुसरीकडे खासगी रूग्णालयाकडून तीन ते ४ लाख रूपये शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे शेतकरी व गरीब रूग्णाच्या परिवारासमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. एकीकडे आपली सर्व दागिने व घरातील वस्तू गहाण ठेवून खासगी रूग्णालयातील शुल्क भरणे व दुसरीकडे इंजेक्शन व कोरोनाच्या औषधांचा काळाबाजार होत असल्यामुळे दुप्पट किमतीत औषधी विकत घ्याव्या लागत आहे. हा सर्व प्रकार खुलेआम होत असून मीडिया व सोशल मीडियामध्ये याबाबतची सर्व प्रकरणे प्रकाशित झाल्यानंतरही प्रशासन मात्र नागरिकांना म्हणतात की पुरावे द्या तरच आम्ही कारवाई करू. किंवा थातूर मातूर कारवाई करून हे प्रकरण दाबल्या जातात. त्यामुळे काही गर्भश्रीमंत डॉक्टर, हॉटेलमालक, मंगलकार्यालय व काही भ्रष्ट अधिकारी यांना कोविड १९ हे कमी वेळात जास्त पैसे कमावण्याचे साधन झालेले आहे.
या जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा व खासगी रूग्णालयातील होणा:या लूटपासून आपल्यासारख्या कर्तव्यदक्ष मंत्र्यांकडून हीच अपेक्षा आहे की जिल्ह्यातील या सर्व जीवघेण्या व आर्थिक संकटातून नागरिकांची सुटका करण्याकरिता शासकिय कोविड रूग्णालय सुरू करून गोरखधंदा करणा:या खासगी रूग्णालयांवर कारवाई करून न्याय करावा.
कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर आपण प्रथमच अमरावती जिल्ह्यात येत आहात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व ऑल इज वेल आहे हे दाखवण्याकरिता पूर्ण तयारी केलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सुसज्ज असलेली रूग्णालये दाखवण्यात येईल तसेच कोरोनाबाबतच्या सर्व पॉझिटिव्ह स्थिती आपल्यासमोर ठेवण्यात येईल परंतु आपण प्रशासनाला कोणतीही सूचना न देता इतर कोविड रूग्णालय व रूग्णाच्या नातेवाईकांना विचारून वस्तुस्थिती समजून घ्यावी. अशा बाबतची विनंती करण्यात येत आहे तसेच जिल्हा नागरिक सुरक्षा कृती समिती तर्फे आपणास या खुल्या पत्राच्या माध्यमातून वस्तूस्थिती बाबत अवगत करत आहोत.
-जिल्हा नागरिक सुरक्षा कृती समिती