अमरावती, दि. १३ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलीटरी कॉलेजसाठी (आरआयएमसी) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. ही प्रवेश परीक्षा पाच जून 2021 रोजी पुण्यात होणार असून, ती फक्त मुलांसाठीच असेल, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेतर्फे कळविण्यात आली आहे.
या परीक्षेसाठी एक जानेवारी 2022 रोजी 11 वर्षे सहा महिन्यांहून अधिक वय असलेले व 13 वर्षांपेक्षा अधिक वय नसलेले विद्यार्थी पात्र आहेत. हा विद्यार्थी एक जानेवारी 2022 रोजी मान्यताप्राप्त शाळेतून सातवी उत्तीर्ण झालेला असावा किंवा सातवीत शिकत असावा. या परीक्षेसाठीचे अर्ज कमांडंट, राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून, उत्तराखंड- 248003 यांच्याकडून मागवणे आवश्यक आहे. त्यासाठी अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांनी जातीच्या दाखल्याच्या सत्यप्रतीसह 555 रुपयांचा व खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी 600 रुपयांचा ‘डिमांड ड्राफ्ट’ पाठवायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट फक्त ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चाच आणि कमांडंट, आरआयएमसी, डेहराडून या नावाने काढावा. हा ड्राफ्ट पेएबल अॅट डेहराडून (तेलभवन बँक कोड नं. 01576) असावा. ड्राफ्ट पाठवल्यानंतर ‘आरआयएमसी’कडून परीक्षा अर्ज, माहितीपत्र व मागील पाच वर्षातील प्रश्नपत्रिकांचे संच पोस्टाने पाठविण्यात येतील. पूर्ण भरलेला अर्ज दोन प्रतीत 15 एप्रिल 2021 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17, डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे 411001 या पत्त्यावर पाठवावा. सोबत जन्मतारीख, जातीचा दाखला, अधिवासी दाखल्याची प्रत व शाळेचे बोनाफाइड सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.
या परीक्षेसाठी इंग्रजी, गणित, सामान्य ज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्य ज्ञानाचा पेपर इंग्रजी किंवा हिंदीत लिहिता येईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 6 ऑक्टोबर 2021 एप्रिल रोजी होतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान यांनी कळवले आहे.