बिहारमध्ये निवडणुकीपूर्वीच विरोधकांत फूट
जीतनराम मांझी यांचा महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय
पाटणा/दि.२० – बिहार विधानसभेच्या निवडणुका वेळेत घेण्यावर निवडणूक आयोग ठाम असताना बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीला फुटीचे ग्रहण लागले आहे. महाआघाडीपासून विभक्त झालेले जीतनराम मांझी संयुक्त जनता दलात दाखल होण्याची शक्यता आहे. मांझी यांनी अखेर महायुती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्तानी अवामा मोर्चाचे (HAM) अध्यक्ष असलेल्या मांझी यांनी गेल्या काही महिन्यांपासून विरोधकांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असेल, हे ठरवण्यासाठी समिती नेमण्याचा आग्रह धरला होता. राष्ट्रीय जनता दलाने तेजस्वी यादव यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका होतील, असे जाहीर केले होते. मांझी यांनी काँग्रेससह अन्य कुणाचेच ऐकले नाही. मांझी यांनी महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) त्यांच्या महाघटबंधनात समन्वय समिती स्थापन करण्याची आणि या समितीमार्फत प्रमुख निर्णय घेण्याची त्यांची मागणी होती; परंतु त्याकडे राष्ट्रीय जनता दलाने फारसे लक्ष दिले नाही. हे लक्षात घेता मांझी यांनी गुरूवारी निर्णय जाहीर केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये किंवा नितीशकुमार यांच्यासोबत जाणे हे दोन पर्याय त्यांच्यासमोर आहेत. आगामी विधानसभा निवडणुका पाहता मांझी यांचा हा निर्णय खूप महत्वाचा आहे.
महाआघाडीत मांझी यांना समन्वय समिती हवी होती. मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारापर्यंत जागावाटप ते सर्व प्रमुख निर्णय त्याच समितीने घ्यावेत, अशी त्यांची इच्छा होती; राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांनी स्वत: ला महाआघाडीचा म्हणून जाहीर केले होते. महाआघाडीच्या समन्वय समितीच्या मागणीसाठी मांझी दिल्लीला गेले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला; परंतु ती झाली नाही आणि चर्चा करूनही समितीबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे मांझी रागावले. पक्षाच्या कोअर कमिटीने मांझी यांना पुढील रणनीती ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. दोन-तीन दिवसांत ते नवीन धोरण जाहीर करतील. मांझी आपला पक्ष संयुक्त जनता दलात विलीन करू शकतात; मात्र पक्षाने याबाबत कोणतेही संकेत दिले नाहीत. संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये दलित आरक्षण, बढतीतील आरक्षण, समान शिक्षण, दलित अत्याचार कायदा आणण्याच्या त्यांच्या संघर्षात जे त्याचे समर्थन करतील, त्यांच्यासोबत जाण्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे.