पुणे/दि. १२ – केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (SII) ‘कोविशील्ड’ लसीच्या एक कोटी दहा लाख कोटी डोसची ऑर्डर दिली. देशात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होत आहे. एप्रिलपर्यंत सीरमला आणखी साडेचार कोटी डोसच्या पुरवठ्याची आर्डर दिली जाईल.
सोमवारी सायंकाळपासून निर्धारित केंद्रांपर्यंत औषध पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीस ती ६० केंद्रांवर पोहोचवली जाईल. तेथून पुढे वितरण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत सांगितले, की पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.’ त्यानुसार, हेल्थ-फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रात संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
पुण्याची कुलेक्स ही कार्गो कंपनी ‘कोविशील्ड’ देशभरात पोहोचवत आहे. उत्तरेत दिल्ली-कर्नाल, पूर्वेत कोलकाता-गुवाहाटीत मिनी हब आहेत. गुवाहाटी पूर्वोत्तर, तर चेन्नई – हैदराबाद हे दक्षिण पॉइंट्स आहेत. फायझरने आपत्कालीन वापराची मंजुरी मागितली आहे. अहमदाबादची झायडस-कॅडिला ‘झायकोव्ह-डी’ आणि रशियाची ‘स्पुटनिक’ ही लसही चाचण्या घेऊन देशात लाँचिंगची तयारी करत आहे. केंद्र सरकारने अॅस्ट्राझेनेकाची व ऑक्सफर्डची ‘कोविशील्ड’ ही सीरम उत्पादित लस आणि स्वदेशी कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोना लसीच्या भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी दिली आहे. ‘कोव्हॅक्सिन’ ही लस भारत बायोटेकने आयसीएमआरच्या मदतीने तयार केली आहे. ती विकत घेण्यासाठी आरोग्य मंत्रालय लवकरच आॅर्डर देऊ शकते.