मेनच्या शेजारी लष्कराला अलर्ट राहण्याचे आदेश
चीनच्या कुरापती सुरूच; उंचावरील प्रदेश पुन्हा भारताकडे
नवीदिल्ली दी २– पूर्व लडाखमध्ये चीनला लागून असलेल्या सीमारेषेवर सध्या प्रचंड तणाव आहे. या भागातील पँगाँग टीएसओच्या दक्षिण किनाऱ्यावरील महत्त्वाचा उंचावरील प्रदेश भारताने आपल्या ताब्यात घेतला आहे. चीनकडून सातत्याने या भागात एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतीय जवानांनी चीनचे हे सर्व प्रयत्न उधळून लावले आहेत.
चीन, नेपाळ, भूतान सीमारेषेवर तैनात असलेले सैन्य हाय अलर्टवर आहे. उत्तराखंड, अरुणाचल, हिमाचल प्रदेश, लडाख आणि सिक्कीम सीमेवर तैनात असलेल्या इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारत, नेपाळ आणि भूतान सीमेचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा दलाला सर्तक राहण्यास सांगण्यात आले आहे. दोन्ही देशात लष्कर पातळीवर चर्चा सुरू असाताना दोन्ही देशाचे रणगाडे एकमेकांच्या फायरिंग डिस्टन्समध्ये (शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा करता येईल एवढ्या अंतरावर) आले आहेत. चीनचे रणगाडे आणि शस्त्रसज्ज वाहने कालाटोप डोंगराच्या पायथ्याथी तैनात करण्यात आली आहेत. हा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे.
चीनकडून जड आणि हलक्या वजनाचे रणगाडे तैनात करण्यात आले असून भारतापासून जवळच्या अंतरावर आहेत. दुसरीकडे कालाटोप येथे तैनात असणारे भारतीय जवानही रणगाडे आणि तोफांसह सज्ज आहेत. कालाटोप भारतीय स्पेशल फ्रंटियर फोर्सच्या ताब्यात असून इतर ठिकाणीही लष्करी तुकड्या तैनात असल्याने चिनी रणगाडे आणि वाहनांची हालचाल सध्या थांबली आहे.
चीनला चकवा देऊन भूभागावर ताबा
चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील उंचावरील प्रदेशात कॅमेरा आणि टेहळणी उपकरणे तैनात केली होती; पण तरीही भारतीय सैन्य दलाच्या विशेष तुकडयांनी चीनला काही कळण्याआधीच हा भाग आपल्या ताब्यात घेतला. “चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या उंचावरील भागात अत्याधुनिक कॅमेरे आणि टेहळणी उपकरणे बसवली होती, तरी भारतीय सैन्य दलाने या प्रदेशावर ताबा मिळवला” असे सूत्रांनी सांगितले.
-
फ्रंटलाईन तुकड्यांना आवरा
चीनकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु भारताच्या जवानांनी तो उधळून लावला. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. चीनकडून सातत्याने सुरू असलेल्या या आक्रमक, चिथावणीखोर कृतीच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनला फ्रंटलाइन तुकडयांना नियंत्रणात ठेवा असे बजावले आहे. दरम्यान, लडाखमधील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला आणि लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी म्यानमार दौरा रद्द केला आहे.