मराठी

सामान्य ग्राहकांना फाईव्ह जीची प्रतीक्षाच

एक ते सव्वादोन लाख कोटी रुपये गुंतवावे लागणार

मुंबई/ दि.२०  –  देशात फाइव्ह जी सेवा सुरू होण्यास भलेही तीन ते चार वर्षे लागणार असतील; मात्र सर्वसामान्य ग्राहकांना यासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागणार आहे. संपूर्ण देशात फाइव्ह जी दूरसंचार सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना एक लाख तीस हजार कोटी रुपये, ते दोन लाख तीस हजार कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. सध्या एवढी मोठी गुंतवणूक करण्याची कोणत्याही कंपन्यांची क्षमता नाही.
या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, निवडक सर्कलमध्ये काही विशेष सेवांसाठीच फाइव्ह जी सुविधा मिळेल. इतर लोकांना हळूहळू ही सुविधा मिळू शकेल. वित्तीय संस्था मोतीलाल ओसवालच्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, फाइव्ह जीमध्ये तीन प्रमुख गुंतवणुकी आहेत. प्रथम स्पेक्ट्रम, दुसरी साइट आणि तिसरी फायबर क्षेत्रात गुंतवणूक करावी लागेल. संपूर्ण देशात फाइव्ह जी नेटवर्क लावण्याची गुंतवणूक लो बँड स्पेक्ट्रमवर एक लाख तीस हजार कोटी रुपये आणि मिड बँड स्पेक्ट्रमवर दोन लाख तीस हजार कोटी रुपये खर्च येईल. वित्त वर्ष २०२३ पासून फाइव्ह जी सुरू होईल,असे गृहीत धरले तरीही येत्या चार-पाच वर्षांत आणखी गुंतवणूक करावी लागेल.
दूरसंचार कंपन्यांची वित्तीय स्थिती आणि प्रति ग्राहक सरासरी महसुलाचा कमी दर पाहता गुंतवणूक खूप कठीण वाटते. अशा स्थितीत संपूर्ण देशात फाइव्ह जी सेवा सुरू करण्याऐवजी या कंपन्या काही सर्कलमध्ये स्पेक्ट्रम घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्ज ऑपरेशनसारख्या सेवांची सुविधा सुरू करतील. भारत तंत्रज्ञान अपडेट करण्यात विकसित देशांपेक्षा १० वर्षे मागे आहे; मात्र फोर जीत हे अंतर घटून चार वर्षे राहिले होते. कारण, तेव्हा जिओने संपूर्ण ताकदीने इकोसिस्टिम अपडेट केली होती; मात्र आता भारताच्या दूरसंचार बाजारात कोणताही नवा खेळाडू उतरण्याची शक्यता नाही.

२६ देशांमध्ये कमर्शियल लाँचिंग

जगातील २६ देशांमध्ये फाइव्ह जीचे व्यावसायिक लाँचिंग झाले आहे; मात्र आतापर्यंत याचे केवळ एक कोटी ग्राहक आहेत. २०२५ पर्यंत ग्राहक संख्या वाढून २८० कोटी होईल, असा अंदाज आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि चीन फाइव्ह जीच्या स्पर्धेत सर्वांत पुढे आहेत

Related Articles

Back to top button