मराठी

भाजपच्या 310 बुथ प्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी दिला पदाचा राजीनामा

अन्याय होत असल्याचा आरोप

शिर्डी/दि.३१- अहमदनगर जिल्हा भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथ प्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करून वेगळी चूल मांडली आहे.
राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील शनिवारी शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचा मनमानी कारभार सुरू आहे. पक्षाची ध्येयधोरणे न राबवता कार्यकर्त्यांवर मनमानी कारभार करत आहेत, या प्रकराचा भाजप कार्यकर्त्यांनी बंड पुकारून निषेध करण्यात केला. श्रीरामपूर तालुक्यासह परीसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीरामपूर शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात आज सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी सर्वानुमते पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टी संचालन समितीची स्थापना करण्यात आली असून जिल्हाध्यक्षाचा कोणताही निर्णय ही समिती आता मान्य करणार नाही, असा ठराव बंड पुकारलेल्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाचे माजी अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने 25 ते 30 जणांची बुथ कमिटी स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बुथ प्रमुखालाच त्या समितीच्या अध्यक्षाचे घटनात्मक पद देण्यात आले होतं. बुथप्रमुख म्हणजेच स्थानिक समिती अध्यक्षांमधून मंडलाध्यक्ष निवडण्यात येईल, असे पक्षाच्या घटनेत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.
बुथ प्रमुखांना अधिकृतपणे मंडलाध्यक्ष निवडीचा अधिकार पक्षाच्या घटनेत देण्यात आला आहे. अशा मुलभूत घटनामत्क अधिकारालाच हरताळ फासून प्रत्यक्ष काम करणाऱ्या संघटनेला कट कारस्थान करुन, वरिष्ठांची दिशाभूल करुन अत्यंत कावेबाजपणे संपवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा घणाघाती आरोप श्रीरामपूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

Back to top button