वरुड/दि.८ – मोसंबीची फळे तोडणीला आली असतांनाच प्रतिकुल वातावरणामुळे मोसंबी वर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात फळगळती होत आहे. तालुक्यात हा प्रकार सर्वत्र दिसून येत असून, मोसंबी उत्पादक संकटात सापडले आहेत. या अज्ञात रोगावर कृषी विभागाने उपाययोजना सुचवून शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मोसंबी उत्पादक शेतकारी करीत आहे.
लिंबूवर्गीय असलेल्या मोसंबीचे वर्षभरात तीन बहार घेता येत असल्याने तसेच उत्पादनाची हमी असल्याने बहुतांश संत्रा उत्पादकांनी मोसंबीला प्रथम पसंती दर्शविली. त्यामुळे वरुड तालुक्यात हजारो हेक्टरमध्ये मोसंबीच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. सध्या आंबिया बहाराची मोसंबी पक्व झाली असून, पावसामुळे शेतक:यांनी ती तोडून बाजारात नेली नाही. त्यातच महिनाभर बरसलेल्या पावसामुळे बुरशीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आणि मोसंबीवर बुरशीजण्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. या बुरशीमुळे रात्रभरात शेकडो टन फळे गळायला व ती दोन दिवसात सडायला सुरुवात झाली आहे. या बुरशीचे कण हवेमुळे दूरवर पसरत असून नियंत्रणात येत नसल्याने नुकसानीचे प्रमाणही अधिक आहे. तालुक्यात मोसंबीचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान कृषी विभागाने मोसंबीच्या बागांची पाहणी करुन शेतक:यांना मोसंबीवरील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना सुचवाव्या तसेच शासनाने झालेल्या नुकसानीबाबत शेतक:यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आता मोसंबी उत्पादक शेतकरी करु लागले आहे.