मराठी

ओवेसींचा ममतादीदींसमोर युतीचा हात

एमआयएम-तृणमूल युती झाल्यास राजकीय समीकरणे बदलणार

कोलकाता/दि.१९  – पश्चिम बंगालच्या राजकीय आखाड्यात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी कालपर्यंत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भिडण्याची भाषा करत होते; मात्र अचानक त्यांनी ममता दीदींसमोर युतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा निर्णय पश्चिम बंगालची सर्व राजकीय समीकरणे बदलू शकतो.
बिहारमध्ये पाच जागा जिंकून आत्मविश्वास दुणावलेल्या ओवेसींची नजर आता पश्चिम बंगालकडे वळली आहे. प्रत्येक राज्यातील विधानसभेत आमदार पाठवून ओवेसी आपला पक्ष मजबूत करताना दिसत आहेत. त्यातच, भाजपला पराभूत करण्यासाठी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा प्रस्ताव ओवेसी यांनी दिला आहे. निवडणूकपूर्व युती करून एकत्र ताकदीने रिंगणात उतरण्याचा ओवेसींचा मानस आहे. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर यासारख्या अल्पसंख्याक मतदारसंघांवर ओवेसींची नजर आहे. त्यामुळे सत्ताधारी तृणमूलचे बळ वापरून मुस्लिमबहुल भागावर एमआयएम लक्ष केंद्रित करू शकते.
विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वीच ओवेसी यांना उपरे म्हणत अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. अशात हातमिळवणी करायची झाल्यास त्यांना तात्विक तडजोड करावी लागेल. पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात मुख्य लढत मानली जाते. काँग्रेस आणि डाव्यांचे आव्हानही ममतांसमोर आहे; परंतु ओवेसी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले, तर त्याचा फटकाही ममता बॅनर्जींना बसू शकतो. तृणमूलची मते खाण्यासाठी भाजपने एमआयएमला बळ दिल्याचा आरोप तृणमूल खासदार सौगता रॉय यांनी केला होता, तर काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी एमआयएम भाजपची ’बी’ टीम असल्याचा आरोप करत ओवेसींवर मतांचे ध्रुवीकरण केल्याचा घणाघात केला होता.

पश्चिम बंगालमधील राजकीय स्थिती

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. याठिकाणी बहुमतासाठी 148 आमदारांच्या संख्याबळाची गरज आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. तर काँग्रेसला 44 , डाव्या पक्षांना 26 आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

Related Articles

Back to top button