मराठी

पाकिस्तानचा शस्त्रे आणि स्फोटके पाठविण्याचा कट उघडकीस

श्रीनगर/दि.१० – नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरच्या केरन क्षेत्रात शस्त्रे आणि स्फोटके पाठविण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सैन्याने हाणून पाडला. सैनिकांनी एके ७४ रायफलसह शस्त्रास्त्रांचा साठा जप्त केला आहे. सतर्क जवानांनी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून (LOC) शस्त्रे पाठविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला. किशनगंगा नदीत दोघा-तिघांना दोरीने बांधलेल्या ट्यूबमध्ये काही वस्तू पाठवताना सैन्याने पाहिले. अधिकारयाने दिलेल्या माहितीनुसार, सैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोन बॅगांमध्ये भरलेल्या चार एके ७४ रायफल, आठ मॅक्झिन आणि २४० काडतुसे जप्त केली. हा परिसर घेरला होता आणि शोधमोहीम सुरू आहे. ते म्हणाले, की पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रे आणि दारूगोळाची तस्करी करण्याचा दहशतवाद्यांचा हा एक कट होता; परंतु सतर्क जवानांमुळे दहशतवाद्यांचा कट उधळून लावला. श्रीनगरस्थित चिनार कोरचे कोर कमांडर लेफ्टनंट जनरल बी एस राजू म्हणाले, की पाकिस्तानने आज सकाळी केरन सेक्टरमधील किशनगंगा नदीमार्गे ट्यूबच्या मदतीने चार एके ७४ रायफल्स आणि दारूगोळाचा साठा पाठविण्याचा प्रयत्न केला; परंतु आमच्या सतर्क जवानांनी पाळत ठेवण्याच्या उपकरणांच्या मदतीने हा साठा जप्त केला. पाकिस्तानच्या इराद्यात कोणताही बदल झालेला नाही हे यावरून दिसून येते. आम्ही भविष्यातही त्यांचे कट उधळून लावू.

Related Articles

Back to top button