पंकजा मुंडेंना जिल्ह्यातच घरचा अहेर!
पत्रकार परिषद घेऊन ऊसतोड कोयता बंद संपासंदर्भात भूमिका केली स्पष्ट
बीड/दि ७ – ‘सरकारने एका नेत्याना विचारात घेऊन ऊसतोड मंजुरांसंदर्भात लवदाचा निर्णय घेवू नये. सर्वांना विश्वासात घ्या,’ अशी मागणी करत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना जिल्ह्यातूनच घरचा अहेर देण्यात आला.
पंकजा लवादाच्या प्रतिनिधी असताना तीन वर्षांचा करार पाच वर्षांवर गेला. त्यामुळे ऊसतोड मजुरांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्यातील १३ नोंदणीकृत संघटनांना विश्वासात घेऊनच ऊसतोडणी संदर्भात सरकारने सामोपचाराने निर्णय घ्यावा, असा इशारा बीड जिल्हा ऊसतोड मजूर संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. ऊसतोड कामगाराला हार्वेस्टरप्रमाणे मजुरी मिळावी, समान काम समान वेतन मिळावे, मजुरीत दीडशे टक्के वाढ द्यावी तसेच १३नोंदणीकृत संघटनेच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन करार करा, अशी मागणी करत आज ऊसतोडणी कामगार, वाहतूक कामगार, मुकादम संघर्ष समितीच्या वतीने बीड जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन ऊसतोड कोयता बंद संपासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.
या वेळी तीन मागण्या करण्यात आल्या. पाच वर्षांचा करार हा तीन वर्षाचा करावा, दीडशे टक्के ऊसतोड मजुरी वाढ द्या, मुकादम कमिशन, एका नेत्याशी बोलून करार करू नये. सर्व संघटनेच्या प्रतिनिधीला बोलवा. सरकारसोबत चर्चा करून सामंजस्याने प्रश्न सोडवू मात्र, सर्वांच्या मतांचा विचार करावा, ऊसतोड मजुरांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, असा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. संघर्ष समितीचे सदस्य माजी आमदार जनार्धन तात्या तुपे, प्रा. सुशीलाताई मोराळे, सीपीआयचे मोहन जाधव ,वंचित बहुनज आघाडीचे शिवराज बांगर, ‘आम आदमी’चे अशोक येडे आदी या वेळी उपस्थित होते.
कोयत्याला न्याय मिळेल
विशेष म्हणजे, आज सकाळीच पंकजा यांनी ट्वीट करून ऊसतोड मजुरांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार अशी माहिती दिली होती. कोयत्याला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पंकजा यांना घरातूनच विरोध सुरू झाला.