मतिमंद, बहुविकलांग मुलांच्या पालकांनी निरामया विमा योजनेचा लाभ घ्यावा
अमरावती, दि. ४: राष्ट्रीय न्यास कायद्यांतर्गत निरामया विमा योजनेचा 18 वर्षांवरील मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांच्या पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल केले.
अठरा वर्षांवरील मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांना राष्ट्रीय न्यास कायद्यांतर्गत पालकत्व योजना राबविण्यात येते. या कामासाठी ऑनलाईन समिती जिल्हास्तरावर गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष व जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. प्रयास विशेष शाळेचे विनायक कडू, अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक नवनाथ इंगोले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम आदी सदस्य आहेत.
या समितीच्या कार्यवाहीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी श्री. नवाल म्हणाले की, मतिमंद, ऑटिझम, बहुविकलांग व स्पास्टिक मुलांच्या पालकांनी पालकत्व योजनेंतर्गतwww.thenationaltrust.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा, तसेच निरामया या विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता नरेंद्र दाभाडे, जिल्हाधिका-यांचे स्वीय सहायक चंदू धकिते, सदस्य गजानन गोस्वामी, ज्ञानेश्वर आमले, महेश शेळके आदी उपस्थित होते.