मराठी

 ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत लागू असलेल्या निर्बंधात अंशत: बदल

कृषि उत्पन्न बाजार समिती, मोठ्या बाजारपेठांत थेट ग्राहकांना जाण्यास बंदी

अमरावती, दि. 24 :  जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. 1 जून 2021 पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहे. तथापि या निर्बंधात काही बाबी संदर्भात अंशत: बदल करण्यात आलेला आहे.
त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा, भाजी मार्केट उदा. इतवारा बाजार, सक्करसाथ इत्यादी येथे किरकोळ व चिल्लर विक्रेते यांना परवानगी अनुज्ञेय राहील. तथापि थेट ग्राहकांना खरेदीकरीता जाता येणार नाही. याठिकाणी दुचाकी वाहन चालकांनी वाहन हे वाहनस्थळी उभे करावे. शक्य झाल्यास सायकलचा वापर करावा.
पिकअप व्हॅन, टाटा अेस (2 टन वाहतूकीची क्षमता) इ. वाहनांचा उपरोक्त परिसरातून वाहतूक करण्याची परवानगी अनुज्ञेय राहील. परंतू लोडींग ट्रक, मालवाहतूक करणारे मोठे ट्रक इत्यादी वाहनांना (2 टन ते 8 टन व त्यापेक्षा जास्त वाहतूक क्षमता) या परिसरातून सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यं वाहतूक करण्यास मनाई राहील.
अमरावती जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समिती, घाऊक बाजापेठ, मोठ्या बाजारपेठा यांनी त्यांच्या स्तरावरुन सुरक्षा रक्षकांची नेमणूक करुन स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समवेत समन्वय ठेऊन गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गर्दीचे विकेंद्रीकरण करावे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी.
उपभोक्ता किंवा सामान्य नागरिकांनी आपल्या जवळच्या अतिपरिचित दुकानातून खरेदी करावी. घाऊक बाजारपेठेमध्ये ग्राहकांना थेट खरेदी करण्याकरीता प्रवेश नाही. वरीलप्रमाणे निर्देशांचे महापालिका आयुक्त, नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपालिका आदींनी पोलीस विभाग, कृषी उत्पन्न बाजार समिती व व्यापारी संघटना यांच्या समवेत समन्वय साधून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी  यांनी दिले आहे.

Related Articles

Back to top button