चेन्नई/दि. ७ -योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद आणि दिव्य मंदिर योग ट्रस्टला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पंतजलीला न्यायालयाने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. पतंजलीच्या आयुर्वेदिक सूत्रामुळे कोरोना विषाणू बरा होऊ शकतो, या दाव्यासाठी न्यायालयाने हा दंड ठोठावला आहे. यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी सुरू केलेल्या कोरोनिल औषधाचा ट्रेडमार्क वापरण्यास मनाई केली होती. चेन्नईस्थित अरुद्र अभियांत्रिकी लिमिटेड कंपनीच्या याचिकेवर न्यायमूर्ती सी.व्ही. कार्तिकेयन यांनी ३० जुलैपर्यंत हा अंतरिम आदेश जारी केला होता. अरुद्र अभियांत्रिकी लिमिटेडने १९९३ पासून ‘कोरोनिल‘ ट्रेडमार्क असल्याचा दावा केला आहे. १९९३ मध्ये ‘कोरोनिल -२१३ एसपीएल‘ आणि ‘कोरोनिल -९ बी‘ नोंदविण्यात आले. तेव्हापासून तिचे नूतनीकरण होत आहे. बाबा रामदेव यांनी बुधवारी दावा केला, की पतंजली आयुर्वेद कोरोनिलची मागणी पूर्ण करण्यासाठी झटत आहेत.
आतापर्यंत तिला दररोज केवळ एक लाख पॅकेट्स पुरवण्यात यश आले आहे. ते म्हणाले,‘आज कोरोनिलच्या १० लाख पॅकेट्सची मागणी आहे; परंतु आम्ही फक्त एक लाख पाकिटे वितरित करण्यास सक्षम आहोत.‘ रामदेव बाबा पुढे म्हणाले, की पंतजली आयुर्वेदने कोरोनिलची qकमत फक्त ५०० रुपये ठेवली आहे; पण जर आम्ही ती पाच हजार रुपये ठेवली असती, तर आज आपण सहजपणे पाच हजार कोटी मिळवू शकू; पण आम्ही ते केले नाही. कोरोनिल कोरोना रुग्णांना बरे करू शकते, असा दावा त्यांनी केला होता; आयुष मंत्रालयाने या विक्रीवर बंदी घातली आणि नंतर मंत्रालयाने म्हटले, की पतंजली हे औषध प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून विकू शकते. मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले होते, की कोरोनिल विषाणूचा उपचार म्हणून कोरोनिल विकू शकत नाही.