पवार कुटुंबीयांची एकत्रित दिवाळी रद्द
मुंबई/दि.९ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व इतर कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी दिवाळी सण साजरा केला जातो; परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्याला होणार्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक कार्यक्रम यंदा रद्द करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना दिवाळीत पवारांना भेटता येणार नाही.
नागरिकांमध्ये कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यंदा सामूहिक दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय पवार कुटुंबीयांनी घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणार्या सहकार्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरूनच शुभेच्छा द्याव्यात. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. कोरोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करुया असे विनंतीवजा आवाहन पवार कुटुंबीयांच्या वतीने राज्यातील जनतेला करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्यावतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले असून बारामती येथे परंपरेनुसार दरवर्षी होणारा सामूहिक दिवाळी उत्सव तसेच पाडव्याचा स्नेहभेटीचा पारंपारिक कार्यक्रम कोरोनामुळे या वर्षी रद्द करावा लागत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरवर्षी दिवाळीला पवार कुटुंबीय बारामतीत येऊन बारामतीकरांसह एकत्रितपणे दिवाळी साजरा करतात. पाडव्याला राज्यभरातून लाखो सहकारी, हितचिंतक बारामतीत येऊन पवार कुटुंबीयांना भेटतात. दिवाळीच्या शुभेच्छा देतात. हा कार्यक्रम सर्वांचा आनंद, उत्साह वाढवणारा असतो. आस्था, आपुलकी, स्नेहपूर्ण वातावरणात होणार्या या कार्यक्रमाची ओढ आपल्या सर्वांनाच असते; परंतु कोरोना संकटकाळात नागरिकांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी अनेक दशकांची सामूहिक दिवाळीची परंपरा यंदा खंडीत करावी लागत आहे. त्यामुळे इच्छा असूनही यंदा भेटता येणार नाही, याचे दु:ख निश्चितच आहे; परंतु कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करायचे असल्याने, कोरोनाला लवकरात लवकर हरवण्याचा निर्धार असल्याने आपल्याला यावर्षी एकत्र येता, भेटता येणार नाही, हे समजून घेतले पाहिजे. कोरोनाला हरवण्यासाठी आणखी काही काळ संयम आणि नियम पाळावे लागतील. त्यामुळे यंदाची दिवाळी आपण सर्वांनी आपापल्या घरी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन सुरक्षितपणे साजरी करण्याचे आवाहन केले आहे.