मराठी

पीडीपीचे मुख्यालय पोलिसांकडून सील

कार्यकर्त्यांची धरपकड

श्रीनगर/दि.२९  – जम्मू-काश्मीरमध्ये लागू झालेल्या नवीन जमीन कायद्याच्या विरोधात पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाने (पीडीपी) सुरू केलेला निषेध मोर्चा पोलिसांनी उधळून लावला आहे. मोर्चात सहभागी झालेल्या पीडीपीचे माजी आमदार खुर्शीद आलम यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून श्रीनगरमधील पीडीपी मुख्यालय सील केले.
केंद्र सरकारच्या आदेशाविरोधात पीडीपी नेत्यांनी श्रीनगर पक्ष मुख्यालय ते प्रेस एन्क्लेव्हपर्यंत निषेध मोर्चा काढण्याचे जाहीर केले. निषेध मोर्चात सामील होण्यासाठी पक्षाचे नेते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचताच पोलिसांनी आधीच तैनात असलेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पोलिस कारवाईस विरोध दर्शविला. आपल्या ट्विटर हँडलवर पक्षाच्या नेत्यांना अटक झाल्याचा संदर्भ देताना त्यांनी लिहिले. की जम्मू-काश्मीर पोलिसांनी जमीन कायद्याविरोधात आंदोलन करत असताना आज पारा वाहिद, खुर्शीद आलम, रऊफ भट, मोसिन कय्यूम यांना अटक केली. आम्ही एकत्रितपणे आवाज उठवत राहू आणि लोकसंख्याशास्त्र बदलण्याचे प्रयत्न सहन करणार नाही.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले, की खुर्शीद आलम वहीद पारा, सुहेल बुखारी, रऊफ भट, मोहित भान आणि इतर नेत्यांना पोलिसांनी पक्षाच्या मुख्यालयाबाहेर ताब्यात घेतले. बुधवारी पीडीपी नेत्यांनी जम्मूमध्येही नवीन जमीन कायद्याच्या विरोधात निदर्शने केली होती. पीडीपीचे नेते आणि कार्यकर्ते शांततेत निषेध करत होते; परंतु सरकार त्यांना अटक करून आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. जम्मूमध्ये निदर्शने करण्यात आली. तिथे निषेध करण्यास परवानगी देण्यात आली; परंतु श्रीनगरमध्ये ती दिली नाही.

Related Articles

Back to top button