दक्षता कार्यप्रणालीचा अवलंब करून उद्याने, ग्रंथालय व प्रयोगशाळांना परवानगी

अमरावती, दि.१५ : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जारी संचारबंदीत शिथीलता आणत उद्याने, ग्रंथालय, प्रयोगशाळा, आठवडी बाजार आदी विविध बाबींना दक्षता कार्यप्रणालीच्या अवलंबाच्या अटीसह परवानगी देणारा आदेश जिल्हा दंडाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जारी केला.
आदेशानुसार. शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. ऑनलाईन शिक्षणाला वाव देण्यात येईल. कंटेनमेंट झोन वगळता इतर ठिकाणी शाळा महाविद्यालयातील 50 टक्के शिक्षक व कर्मचा-यांना ऑनलाईन शिक्षणासाठी, टेलिफोन समुपदेशन व इतर कामासाठी शाळेत उपस्थित राहता येईल. कौशल्य विकास महामंडळ, कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय उद्योजकता संस्था व त्याअंतर्गत प्रशिक्षण केंद्रांना आरोग्य मंत्रालयाच्या मानक कार्यप्रणाली उपक्रम राबविण्यास परवानगी देण्यात आली आहे. उच्च शैक्षणिक संस्था, पीएचडी संशोधन, विज्ञान स्नातकोत्तर विद्यार्थी, तंत्रज्ञान प्रयोगशाळा आदींना दक्षता कार्यप्रणालीचा अवलंब करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक ग्रंथालये सुरु करण्यात आली आहेत. सार्वजिक उद्याने, बगिचे औद्योगिक विभागाच्या कार्यप्रणालीनुसार खुले ठेवता येतील. कंटेनमेंट झोन वगळता इतरत्र व्यवसाय प्रदर्शन आयोजित करता येईल. सार्वजनिक आठवडी बाजार, गुरांचे बाजार यांनाही परवानगी आहे, मात्र त्यासाठी महापालिका व जिल्हा परिषदेने स्वतंत्र कार्यप्रणाली तयार करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश आहेत. दुकाने व आस्थापनांची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील. हे आदेश 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहतील. इतर बाबतीतील आदेश कायम आहेत.