पेट्रोल 93 रुपयांवर
भोपाळ/दि.१९ – मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोल 93.04 रुपये प्रतिलिटर इतक्या किंमतीपर्यंत पोहोचले आहे. दिल्लीत पेट्रोल 85.20 रुपये प्रतिलिटर विकले जात आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग दुसर्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मंगळवारी राजधानी दिल्लीत पेट्रोल 85.20 रुपये होते तर डिझेल 75.38 रुपये होते. डिझेल आणि पेट्रोल या दोहोंच्या किंमती 25-25 पैशांनी वाढल्या आहेत. यापूर्वी सोमवारी डिझेल 27 पैशांनी तर पेट्रोल 25 पैशांनी महागले होते. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पेट्रोल 93.04 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. जानेवारीत सहाव्या वेळी किंमतीमध्ये वाढ झाली आहे. जानेवारीत आतापर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सहा पट वाढ झाली आहे. या काळात राजधानी दिल्लीत पेट्रोल 1.49 रुपये प्रति लिटर महागले आहे. दुसरीकडे डिझेलबद्दल बोलायचे तर या महिन्यापर्यंत त्याची किंमत प्रति लिटर 1.51 रुपयांनी वाढली आहे. 7 डिसेंबरला पेट्रोल दिल्लीमध्ये 83.71 रुपये आणि डिझेल 73.87 / लीटर दराने विकले गेले. यानंतर 29 दिवस किंमती वाढल्या नाहीत; परंतु सहा जानेवारी रोजी या महिन्यात पहिल्यांदा किंमती वाढविण्यात आल्या. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कोरोना साथीच्या काळात तेल उत्पादक देशांकडून कमी उत्पादन मिळाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. कमी उत्पादनामुळे तेलाची मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाले आहे. काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रतिपिंप 35 ते 38 डॉलर होते, आता ते प्रतिपिंप 54 ते 55 डॉलरपर्यंत पोचले आहेत. त्यामुळे पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ केली. जगभरातील टाळेबंदीमुळे कच्च्या तेलाचे दर दोन दशकांच्या नीचांकावर पोहोचले. या काळात सरकारने एक लिटर पेट्रोलवर उत्पादन शुल्कात 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये वाढ केली होती. आता ते पेट्रोलवर 33 रुपये आणि डिझेलवर 32 रुपयांवर पोहोचले आहे.