राष्ट्रवादीत जाणार नसल्याचे पिचड यांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे

नगर/दि.१७ – विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले नेते आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले वैभव पिचड यांनी अत्यंत सूचक प्रतिक्रिया देत सध्या तरी ‘घरवापसी‘ करणार नाही, असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे भाजपमध्ये दाखल झाले होते. ते राष्ट्रवादीत परततील, असे म्हटले होते. त्यामुळे पिचड पितापुत्र परत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी राजकीय चर्चा रंगली होती, यावर वैभव पिचड यांनी खुलासा केला. ‘माझ्याशी कुणाचाही संपर्क नाही. मी आहे त्या घरी सध्या तरी सुखी आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्न नाही‘ असे वैभव म्हणाले.