मंदिर, मस्जीद, चर्च, देरासर, गुरुद्वारा, बुद्धविहार प्रार्थनास्थळे ८ सप्टेंबरपर्यंत खुली करावी
-
केंद्रीयमंत्री व रिपाई नेता रामदास आठवलेची मागणी
-
अन्यथा ९ सप्टेंबरपासून आंदोलन करण्याचा इशारा
मुंबई/दि.३१– राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मंदीर आंदोलनानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनीही सरकारला इशारा दिला आहे. मंदिर, मस्जीद, चर्च, देरासर, गुरुद्वारा, बुद्धविहार यांसह सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे 8 सप्टेंबरपर्यंत खुली करावीत. लॉकडाऊन व सुरक्षा नियमांचे पालन करून पोलीस बंदोबस्तात 8 सप्टेंबरपर्यंत मंदिर खुली करावीत, अशी मागणी रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने केली आहे. 8 सप्टेंबरपर्यंत मंदिरे न उघडल्यास 9 सप्टेंबरपासून रिपब्लिकन पक्षाच्या नेतृत्वात आंदोलन केले जाईल, असा इशाराही आठवलेंनी दिला आहे.
राज्य सरकारनं माझ्यासह 15 जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. राज्यातील प्रार्थनास्थळं सुरू करण्यासाठी सरकारनं 10 दिवसांची मुदत मागितली आहे. या दिवसांत सरकारकडून नियमावली जारी करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. 10 दिवसांत नियमावली तयार झाली नाही, तर आम्ही पुन्हा पंढरपूरात आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांशी बोलताना आपण त्यांना काळाराम मंदिराची आठवण करून दिल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. देश पारतंत्र्यात असताना बाबासाहेब आंबेडकर यांना नाशिकमधील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी सत्याग्रह केला होता. त्यावेळी मंदिराची किल्ली पुजाऱ्याच्या हाती होती. आता मंदिराची किल्ली तुमच्या हाती आहे, असं मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं आंबेडकर म्हणाले.
भाजपाने राज्यात उद्धवा दार उघड म्हणत मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर, आज सोमवारी वंचित बहुजन आघाडीने पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात जाऊन मंदिरे उघडण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी, मुख्यमंत्र्यांनी जनभावनेचा आदर केला. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, असं आंबेडकर म्हणाले. राज्यातील प्रार्थनास्थळं लवकरच उघडली जातील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचं त्यांनी सांगितलं. वंचितनंतर आता रामदास आठवले यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सरकारला इशारा दिला आहे.