मराठी

चिखलद-याच्या विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा

मो. अशरफ यांच्या चिखलदरा पर्यटन पुस्तकाचे प्रकाशन

अमरावती, दि.१५ : मध्य भारतातील महत्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या चिखलद-याच्या पर्यटन विकासासाठी विविध तज्ज्ञांच्या मदतीने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
ज्येष्ठ पत्रकार मो. अशरफ हाफिज हबीब यांनी लिहिलेल्या ‘चिखलदरा पर्यटन’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकाराने अत्यंत अनौपचारिक वातावरणात आज शासकीय विश्रामगृहात झाला. या पुस्तकाचे प्रकाशन करताना  पालकमंत्री श्रीमती ठाकूर बोलत होत्या. श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष गोपाल हरणे, ज्येष्ठ संपादक सर्वश्री प्रदीप देशपांडे, दिलीप एडतकर, विलास मराठे, मराठी भाषा विभागाचे सहायक संचालक हरीश सूर्यवंशी, ॲड. श्रीकांत खोरगडे, नागपूर येथील जिल्हा माहिती अधिकारी (विशेष कार्य) अनिल गडेकर, ज्येष्ठ पत्रकार अनिल कडू, त्रिदीप वानखडे, नरेशचंद्र काठोळे, जि. प. माजी सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर पत्रकार, तसेच पर्यटनप्रेमी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पौराणिक, ऐतिहासिक महत्व लाभलेल्या व पर्वतराजी, निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिखलद-याचे स्थान अनन्यसाधारण आहे. तेथील स्थानमहात्म्य व पर्यटकांसाठी मौलिक माहिती देणारे पुस्तक लिहून अशरफ भाईंनी चिखलद-याविषयीच्या उपलब्ध ग्रंथसंपदेत मोलाची भर घातली आहे. चिखलद-याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी अशरफभाईंसारखी जाणकार मंडळी व इतरही अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन व मदत घेण्यात येईल. चिखलदरा पर्यटन या माहितीपूर्ण पुस्तकाच्या सर्व कार्यालयांत उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
पुस्तकाचे लेखक अशरफभाई आणि चिखलदरा हे एक अतुट नाते आहे. पत्रकार किंवा चिखलद-याबाबत जिज्ञासा, प्रेम असलेली प्रत्येक व्यक्ती चिखलद-यात गेल्यावर अशरफभाईंची भेट ठरलेलीच असते. अनेक वर्षांपासून ते तिथे कार्यरत आहेत व देशभरातील माध्यमांच्या चिखलद-याविषयीच्या माहितीचा अनेक वर्षांपासून स्त्रोत राहिले आहेत. पत्रकार व लेखक असण्याबरोबरच मदतीला धावून जाणारा मित्र, भावाला किडनीदान करणारा कुटुंबवत्सल गृहस्थ असे त्यांचे अनेक पैलू आहेत, असे पत्रकार श्री. कडू यांनी सांगितले.
अशरफभाई हा जिंदादिल माणूस आहे. चिखलद-यासारख्या सुंदर ठिकाणी असा स्वागतशील, लाघवी व जाणकार पत्रकार असणे हे त्या ठिकाणाचीही समृद्धी वाढविणारे असल्याचे श्री. हरणे यांनी सांगितले. लेखक श्री. अशरफभाई यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी प्रास्ताविक केले. श्री. गडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात अनेक पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button