विभागीय क्रीडा संकुलात कोविड रुग्णालयाचे नियोजन
आ. सुलभाताई खोडके यांची आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्याशी चर्चा
अमरावती/दि.२५ – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री ना. राजेशजी टोपे यांनी 25 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील कोरोनाची सद्य:स्थिती व उपाययोजना यासंदर्भात आढावा घेतला . या बैठकीमध्ये आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी कोविड संदर्भातील विविध उपाययोजनांबाबत आरोग्यमंत्र्याचे लक्ष वेधले . कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी व उपाययोजनांना घेऊन शासन सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. कोविड -१९ च्या काळात शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाचा मुद्दा पुढे आल्याने या निमित्ताने शासन -प्रशासनाच्या पुढाकाराने पर्याप्त आरोग्य सुविधा व व्यवस्था करणे गरजेचे आहे . अमरावती जिल्यातील कोविड ची स्थिती पाहता शासकीय ,तसेच खाजगी रुग्णालय, महापालिका यांच्या अधिनस्त असणाऱ्या सर्व रुग्णालयांत कोविड संदर्भात योग्य नियोजन केले जात आहे . ज्यामध्ये एकूण आयसोलेशन बेड , ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड , उपलब्ध व्हेंटिलेटर , यासह अन्य आवश्यक बाबी लक्षात घेता अमरावती जिल्यातील कोरोना उपचारासंदर्भात तीन भागात विभाजन करण्यात आले आहे . यामध्ये कोविड हॉस्पिटल , कोविड केअर सेंटर ,व कोविड हेल्थ सेंटर अशी विभागणी करून रुग्णांवर उपचार केले जात आहे . अमरावती जिल्यात ३७ ठिकाणी कोविड संदर्भातील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे . यामध्ये काही खाजगी रुग्णालयासह वसतिगृह ,निवासी शाळा , हॉटेल , आदी ठिकाणी उपचाराची व्यवस्था केली जात आहे. तर २७ सेंटरवर रुग्ण दाखल असून त्यांचेवर उपचार केल्या जात आहे . अशा संकलित माहितीच्या आधारे आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी या आढावा बैठकीदरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना अवगत केले .
अमरावती शहरी भागात(महापालिका क्षेत्र ) आजतागायत एकूण १४५३ रुग्ण गृहविलगीकरणात असून त्यापैकी १०३७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे ,तर ४१६ कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आहे . परंतु रुग्णसंख्येचा वाढता आलेख पाहता आता अतिरिक्त व्यवस्था वाढविणे गरजेचे झाले असल्याचे सांगून शासकीय रुग्णालयाबरोबरच खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची तरतुद करून प्रशासनाच्या व डॉक्टरांच्या साहायाने हि स्थिती नियंत्रणात आणावी लागणार आहे . या बाबीवर गांभीर्याने प्रकाश टाकीत अमरावतीत कोरोनाचा प्रादुर्भाव बघता जास्त रुग्ण क्षमतेची व्यवस्था करण्यासाठी विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे कोविड रुग्णालय उभारून त्या ठिकाणी बेडची , आयसीयू ची व ऑक्सिजन बेड ची उपयुक्त व्यवस्था एकाच वेळी होऊ शकणार आहे .या बाबत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास यामुळे कोविड साठी गतिशील आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे . दरम्यान रुग्णांना लागणाऱ्या रेमेडीसेविर इंजेक्शन ची संख्या आणि उपलब्ध साठा याचा सातत्याने आढावा घेऊन ज्या भागात रुग्ण आहेत ,त्या भागात रेमेडीसेविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी उचित नियोजन करणे सुद्धा निकडीचे असल्याचे सुलभाताईंनी बैठकीत सांगितले . रेमेडीसेविर इंजेक्शनच्या साठ्याबाबत तसेच दैनंदिन वितरण व वापर याबाबतची माहिती नियंत्रण कक्षात उपलब्ध करून देण्याचे शासनाचे निर्देश आहेत . या संदर्भात अमरावतीमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करून सतत समन्वय ठेऊन काटेकोर सनियंत्रण करणे सुद्धा गरजेचे आहे .
कोविडच्या उपचारात सरसकट सर्वच रुग्णांना रेमेडीसेविर इंजेक्शन न देता रुग्णाला कोणत्या टप्यात रेमेडीसेविर इंजेक्शन वापरावे या साठीचे आवश्यक प्रोटोकॉल शासनाकडून ठरविण्यात येणार आहे . कोरोना उपचारामध्ये रेमेडीसेविर इंजेक्शन कोविड रुग्णासाठीच बंधनकारक आहे . परंतु कोरोना बरोबरच सारीचे रुग्ण सुद्धा वाढत असून सारी या आजाराचे रुग्ण हे कोविडमध्ये रूपांतरित होत आहे . त्यामुळे रेमेडीसेविर इंजेक्शन चा वापर सारीच्या रुग्णांसाठी केल्यास सारीतून कोविडचा प्रादुर्भाव रोखला जाईल , असे काही तज्ज्ञ जाणकारांचे मत आहे . यावरही आरोग्य यंत्रणा व प्रशासनाने विचार करणे अगत्याचे असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी याबाबीकडे सुद्धा नामदार राजेश टोपे यांचे लक्ष वेधले . तसेच याबाबत आ. सौ . सुलभाताई खोडके यांनी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन सुद्धा सादर केले . अमरावती मध्ये कोविद-१९ उपाययोजना व उपचारांबाबत रुग्णांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते . ही बाब हेरून अमरावती मध्ये कोविड संदर्भातील सुविधांचे किती रुग्णालय वा सेंटर आहे . कुठे बेड उपलब्ध आहे ,आयसीयू ची उपलब्धता , उपचारासाठीची आवश्यक सेवा , या संबधीची रुग्णांना पूरक माहिती मिळावी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक सार्वजनिक रित्या कार्यान्वित करण्याची विंनतीपूर्वक मागणी आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनातून व्यक्त केली .