मुर्तीजापुर/दि.२६ – तालुक्यातील गोरेगाव (पुंडलिक महाराज), सांजापूर ते मिर्झापूर व पुढे कोळंबी येथील राष्ट्रीय महामार्गाला जोडणा-या अंतर्गत रस्त्याची दुर्दशा झाली असून खड्ड्यांमध्ये रस्ता की रस्त्यामध्ये खड्डे ओळखणे मुश्किल झाले आहे. सदर अंतर्गत रस्त्याची गेल्या कित्येक वर्षापासून दुरुस्तीच्या नावावर बोंबाबोंब असून रस्त्यावरील डांबर, गिट्टी पूर्णपणे निघून गेलेली आहे.यावर्षी झालेल्या पावसामुळे तर आणखीनच रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली असून या रस्त्याने प्रवास करणे कठीण झाले आहे.विशेष म्हणजे कोळंबी येथील राष्ट्रीय महामार्गापासून मिर्झापूर,सांजापूर रेल्वे गेट,गोरेगाव आणि तेथून पुढे मुर्तीजापुर चिखली पळसो मार्गे अकोलाकडे जाणाऱ्या रस्त्याला हा रस्ता येऊन मिळत असल्याने मोठी वर्दळ या रस्त्यावरून असते. परंतु सद्यस्थितीत हा रस्ता येणे-जाणे करण्याकरता अत्यंत धोकादायक झालेला असून या रस्त्यावर असलेल्या एका नाल्याच्या मोरीवर मोठा जिवघेणा खड्डा पडलेला आहे.रात्रीच्या सुमारास प्रवास करत असताना हा खड्डा जर दिसला नाही तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला असून गावकर्यांनी या खड्ड्यावर तात्पुरत्या काट्याच्या फांद्या आणून टाकल्या आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास नजरचुकीने जर हा खड्डा दिसला नाही तर मात्र अपघात होऊन अप्रिय घटना घडू शकते असे या रस्त्यावरून प्रवास करणारे सांगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डयां सोबत नाल्याच्या मोरीवर पडलेला जीवघेणा खड्डा प्रथम बुजवावा अशी मागणी केल्या जात आहे. तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची हीच अवस्था आहे.अंतर्गत रस्ते बनवत असताना याकडे कोणाचेही लक्ष नसते. त्यामुळे कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार याची भेसळ करून आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देऊन मोठा मलिदा लाटण्याची प्रकार अंतर्गत रस्त्यांच्या कामांतून केल्या जात असल्याचा आरोप गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. कुठेही अंतर्गत रस्त्यांची कामे ही गुणवत्तापूर्ण तसेच नियमानुसार झालेली दिसून येत नाही. अधिकारी,अभियंते,गुणवत्ता तपासणी एवढे सर्वकाही असताना देखील रस्त्यांचा प्रश्न आहे तिथेच आहे एवढे मात्र खरे.या दृष्टचक्रातून किंवा आखून घेतलेल्या सिमित सिमेतून सीमोल्लंघन करण्याचे धाडस कधी होईल हाच खरा प्रश्न आहे.
Attachments area