मुंबई दि २४ – शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे. सध्या शोधमोहीम सुरू आहे. यासोबतच सरनाईकांसंबंधीत इतर 10 ठिकाणांवरही ईडीकडून शोधमोहीम केली जात आहे. सरनाईक यांच्या मुलांच्या घरी आणि कार्यालयांमध्ये सकाळी ईडीचे पथक दाखल झाले होते.
प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरी पोहोचत ईडीने धाडी टाकल्या आहेत. यानंतर ईडीने विहंग यांना ताब्यात घेतले. विहंग यांना घेऊन ईडीचे पथक रवाना झाले आहे. दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत प्रकरणात प्रताप सरनाईक यांनी आवाज उठवत विरोध केला होता. त्यांचा आवाज दाबण्यासाठी तसेच त्यांची कोंडी करता यावी, यासाठी ही कारवाई केल्याची चर्चा आहे; मात्र भाजपच्या प्रवक्त्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आमदार सरनाईक यांच्याशी संबंधित दहा ठिकाणांवर ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकल्या. या कारवाईवर शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा. सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राउत यांनी दिली आहे. ईडी असो. अन्य कुणीही; एखाद्या राजकीय पक्षाच्या शाखेप्रमाणे काम करू नये असा सल्ला त्यांनी दिला.
ईडीचा किंवा कुणाचा दबाव सरकारवर आणणार्यांनी लक्षात घेतले पाहिजे, की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. पुढील 25 वर्षे तुमची सत्ता येणार नाही ही काळ्या दगरावरची रेष आहे. हे स्वप्न आता विसरूनच जा, असे राऊत म्हणाले. ईडी ज्या लोकांचे आदेश पाळत आहेत, त्यांच्या शंभर माणसांची यादी मी देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लाँड्रिंग कशा पद्धतीने चालते आणि निवडणुकीत पैसा कुठून पैसा येतो, इथपासून तो कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वगैरे याची कल्पना ईडीला नसली, तरी आम्हाला आहे; पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधार्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखे वागत असतील, तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटिशी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रे सादर करा; पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो, असा टोला त्यांनी लगावला.
सरनाईक यांच्या घरात ईडीने शोधमोहीम सुरू केल्यानंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही संताप व्यक्त केला. संस्थांचा वापर राजकारणासाठीच केला जातो. भाजपशासित राज्यातील नेत्यांवर अशी कारवाई झाल्याचे कधी ऐकले नाही; पण जे भाजपच्या विरोधात भूमिका घेतात त्यांना त्रास होतो, असे थोरात म्हणाले.
ईडीच्या कारवाईनंतर राज्यातील राजकारण तापले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की काही पुरावे असतील म्हणूनच ईडीने सरनाईकांवर कारवाई करत धाड टाकली आहे. ज्यांनी चूक केलेली नाही, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. काही पुरावे मिळाले असतील म्हणूनच ईडीकडून कारवाई करण्यात आली असेल. ईडी पुरावे असल्याशिवाय कारवाई करत नाही.
-
पवारांवरील कारवाईचे काय?
पुरावे असल्याशिवाय ईडी कारवाई करीत नाही, असे भाजपचे नेते म्हणत असतील, तर शरद पवार यांना गेल्या वर्षी ईडीने बजावलेल्या नोटिशीचे काय झाले आणि पवार यांनी ईडीच्या कार्यालयात येण्याची तयारी दाखवूनही त्यांना नंतर का बोलवले नाही, असा सवाल केला जात आहे.