रोजगार आणि शेतीभिमुख अर्थसंकल्पाची शक्यता
मुंबई/दि. ६ – अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती आणि शेतीतील उत्पन्नवाढीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातून बाजाराला जास्त अपेक्षा आहेत.
आयआयएफएलचे संस्थापक अध्यक्ष निर्मल जैन म्हणाले, की सरकारने अर्थसंकल्पाच्या पलीकडे बरीच पावले उचलली आहेत. कोविडनंतर सरकार आणि रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे. या अर्थसंकल्पात आता रोजगार, शेतकरी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या अर्थसंकल्पात शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. कोविडनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे; परंतु अद्याप वेगवान वाढ होण्याची गरज आहे. चीनमध्ये अंतर्गत परिस्थिती चांगली नाही. जॅक मासारखा उद्योजक बेपत्ता होत असेल, तर चीनमध्ये गुंतवणूक करणा-यांमध्ये चिंता वाढेल. अशा परिस्थितीत जागतिक कंपन्या एक पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. या संधीचा फायदा घेऊन सरकारने परकीय गुंतवणूकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. जेथे शक्य असेल तेथे कराचे दर कमी केले पाहिजेत.कर कमी केल्याने अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्ती वेगवान होईल. मागणीत सुधारणा केल्यास अर्थव्यवस्थेत वाढ दिसून येईल, असे सांगून जैन म्हणाले, की सार्वजनिक उपक्रमांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक वाढवायला हवी. आव्हानांना संधींमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. महागाई जगभरात वाढत आहे; परंतु भारतीय बाजारपेठेतीव महागाईचा दर उच्चांकी आहे. जागतिक कंपन्यांसाठी भारत स्वीट स्पॉट आहे. देशातील कोविडची प्रकरणे झपाट्याने कमी होत आहेत. लसीनंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा आणखी वाढली आहे. भारतात एफआयआयची गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. एफआयआयचा चीनवरील विश्वास कमी होत आहे. अशा स्थितीत भारतात एफआयआयची गुंतवणूक आणखी वाढू शकते. 2021 भारतीय बाजारपेठेसाठी चांगला असू शकेल. जैन म्हणाले, की कोविड लसीनंतर ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल. लोक खर्च करण्यासाठी पुढे येतील. कोविडला घाबरलेले लोकही बाजारात गुंतवणूक करतील.