वॉशिंग्टन/दि.१४ – अमेरिकेत फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशनने सर्व 50 राज्यांच्या पोलीस प्रमुखांना अतिदक्ष राहण्याचा इशारा दिला आहे. 20 जानेवारीला नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या शपथ ग्रहण समारंभात मोठ्या प्रमाणात हिंसा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेच्या सर्वांत मोठ्या तपास एजन्सीने म्हटले आहे, की 20 जानेवारीच्या पूर्वी आणि काही दिवसांनंतरपर्यंत सर्वत्र अतिदक्ष राहा. कट्टरपंथी हिंसा पसरवू शकतात. काही दिवसांपूर्वी सीएनएनने तपास एजन्सीच्या सूत्रांच्या हवाल्याने अशाच प्रकारचा इशारा दिला होता. होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटने याची पुष्टी करण्यास नकार दिला होता. आता एफबीआयने स्वतः बुलेटिन जारी करून धोक्याचा इशारा दिला आहे.
एफबीआयचे संचालक क्रिस्टोफर वेरी आणि होमलँड सिक्युरिटी केनेथ कुसनेली यांनी बुधवारी एक मोठी बैठक घेतली. काही वेळानंतर दुसर्या इंटेलिजन्स एजन्सीजचे प्रमुख या दोन्ही अधिकार्यांना भेटले. संध्याकाळी पुन्हा एक बैठक झाली. सुरक्षा आणि तपास यंत्रणांपुढे हे मोठे आव्हान आहे. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सने बुधवारी रात्री मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. सत्तांतरामुळे श्वेत कट्टरपंथी आणि ट्रम्प समर्थक प्रचंड नाराज आहेत. याच लोकांनी गेल्या आठवड्यात गुरुवारी संसदेच्या आत आणि बाहेर हिंसा केली होती. हाच गट पुन्हा हिंसा करु शकतो.
रिपब्लिकनच्या राज्यांत जास्त धोका
अशा राज्यांमध्ये खूप जास्त धोका आहे, जिथे रिपब्लिकन पक्षाचे सरकार आणि गव्हर्नर आहे. खरं तर अमेरिकेमध्ये राजकीय हिंसेच्या घटना खूप कमी होतात किंवा होतच नाहीत; मात्र मध्यंतरी अशा वेळा आल्या की, विरोध प्रदर्शनदरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये गोंधळ उडाला. मागच्या गुरुवारीही असेच झाले होते.