पीपीएफचा व्याजदर कायम राहणार
मुंबई/दि. ४ – पीएफ अंतर्गत येणा-या लोकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 2020-21 या वर्षाच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. म्हणजेच, कामगारांना साडेआठ टक्के दराने व्याज मिळणार आहे. 2019-20 साठीही ते साडेआठ टक्केच होते.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला आहे. व्याजदर कमी होणे अपेक्षित होते; परंतु पूर्वीचा दर कायम ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये पीएफवरील व्याज दर सात वर्षांच्या नीचांकावर होते. त्या वेळी 2019-20 साठी साडेआठ टक्के व्याज जाहीर केले होते. 2018-19 मध्ये ते 8.65 टक्के होते. 2017-18 मध्ये हा दर 8.75 टक्के होता. 1984 मध्ये, प्रथमच ईपीएफचा व्याजदर दहा टक्क्यांहून अधिक होता. पीएफधारकांसाठी सर्वात चांगलीा काळ 1989 ते 1999 पर्यंत होता. या दरम्यान, व्याज दर 12 टक्के होते. तथापि, त्यानंतर त्यात घसरण सुरू झाली. पुन्हा कधीही दहा टक्क्यांपर्यंत पोहोचले नाही. 2001 पासून हा व्याजदर साडेनऊ टक्क्यांच्या खाली आहे. गेल्या सात वर्षात तो साडेआठ टक्के आहे.
डिसेंबरच्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार एकूण 80.40 लाख नवीन सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाले. देशातील एकूण सहा कोटी 44 लाख लोक पीएफच्या अखत्यारीत आहेत. 20 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना रोजगार देणा-या कंपन्या आणि ज्यांचा पगार 15 हजार रुपयांपर्यंत आहे, ते ईपीएफमध्ये येतात.