15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात
-
मुख्य परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेणार
-
विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी
मुंबई/दि.३– अंतिम वर्ष परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न असून विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बात म्हणजे परीक्षा सोप्या पद्धतीनं होणार असल्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
अंतिम वर्ष परिक्षेबाबत आज महत्वाची बैठक पार पडली.
त्यानुसार ऑक्टोबरमध्ये परीक्षा घेणार असून 31 अक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. प्रॅक्टिकल परीक्षा सुद्धा फिजिकली करण्यास लागू नये, अशी पद्धत अवलंबणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. परीक्षा कशा घ्यायच्या हा निर्णय कुलगुरू आणि विद्यापीठांनी घ्यायचा होता. परीक्षा घेण्यासाठी वेगवेगळे पर्याय समोर आहेत. त्यावर चर्चा सुरू असून सोपी पद्धत वापरण्यावर एकमत झाले असल्याचे ते म्हणाले.उर्वरित बाबींवर आज रात्रीपर्यंत निर्णय घेऊ. आज अहवाल फायनल करुन उद्या दुपारपर्यंत परीक्षा पद्धती कशा घ्यायच्या यावर पूर्णविराम लावण्याचा प्रयत्न आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय करायचं याबाबतही आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. राज्यपाल आणि आमच्यामध्ये विसंगती नाही. आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात असून राज्यपालांशी चर्चा सकारात्मक झाली. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रॅक्टिकल्स होतील. याचाच अर्थ ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होतील. विद्यार्थ्यांनी मनात कुठलाच संभ्रम न ठेवता अभ्यासाला लागावं, असंही ते शेवटी म्हणाले.